साताऱ्यात कोंडवे परिसरातील ढाब्यासमोर धारदार शस्त्राने हल्ला; दोघे जखमी, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा : येथील कोंडवे परिसरातील नितीराज मालवणी ढाब्यासमोर जुन्या वादाच्या कारणातून तिघांनी दोघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी ३ जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रथमेश उर्फ टॉमी बाळासाहेब जगताप (वय २४, रा. वर्ये, सातारा) याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौशल्य बेबले, तानाजी वाघमारे आणि प्रतीक बाबर (तिन्ही रा. रामनगर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश व त्याचा मित्र रोहित हे ढाब्याच्या बाहेर गेटसमोर उभे असताना आरोपी कौशल्य हा हातामध्ये अज्ञात धारदार शस्त्र घेऊन बाहेर आला. त्याच्यासोबत तानाजी वाघमारे आणि प्रतीक बाबर दोघेजण होते. यावेळी तिघांनी "तुला मस्ती आली आहे का, तुला दाखवतो" असे म्हणत वाद घातला. त्यानंतर कौशल्य याने त्याच्या हातातील शस्त्राने प्रथमेशच्या मानेवर, खांद्यावर व डाव्या मांडीवर सपासप वार करून जखमी केले. यावेळी प्रथमेशचा मित्र रोहित याला देखील चाकूने भोकसून जखमी केले. ही घटना दिनांक ६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी देखील घटनास्थळी भेट देत आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली साताऱ्यात नागरिकांची तब्बल ७० लाखांची फसवणूक; दोन जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात मुलींचे वसतीगृह चालकास शिवीगाळ व मारण्याची धमकी; प्रवेशावरून वाद

संबंधित बातम्या