कौतुकास्पद ! सातारा तालुका पोलिसांची विसर्जन मिरवणूक ठरली आगळी वेगळी

मिरवणुकीत पारंपारिक पोषाख; वाद्ये व मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके

by Team Satara Today | published on : 09 September 2025


सातारा, दि. ८ : सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही दहा दिवस गणेश उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनंत चतुर्दशी दिवशी पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुकी सायंकाळी काढण्यात येतात. त्यासाठी रात्री उशीरा पर्यंत पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त रहावे लागते. म्हणुन त्यापूर्वी म्हणजे शनिवारी (दि ६) सकाळी ११ वाजता सातारा तालुका पोलीस ठाण्याची गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. पोलिस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड जवानांनी विशेष रंगातील ड्रेसकोड सह पारंपरिक संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेऊन सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.सातारा शहरातुन निघालेली ही अनोखी मिरवणुक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

गणेशाचा निरोप घेताना सातारा तालुका पोलिसांनी आदर्शवत विसर्जन मिरवणूक कशी असावी याचे एक आदर्श उदाहरण दाखवून दिले आहे. या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीचे व्हिडियो, फोटो समाज माध्यमांवर झळकल्याने सातारा शहर व तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या मिरवणूकीची चर्चा नागरिकांमध्ये व सातारा जिल्हा पोलिस दलात होत आहे.मिरवणुकी दरम्यान सातारा तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक निलेश तांबे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व दुय्यम पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला कर्मचारी व होमगार्ड जवानांनी एकच पोषाख परिधान केला होता. त्यावर विविध रंगाचे फेटे नेसुन गळ्यात टाळ घेऊन मृदंगाच्या सुमधुर तालावर मिरवणुकीला सुरुवात केली.

गुलालाऐवजी फुलाची उधळण करत डीजेच्या दणदणाटाला फाटा देत टाळ मृदंगाचा खणखणाट करत उत्साही वातावरण तयार केले होते. पोलिस कर्मचारी, महिला पोलिसांचा ड्रेस कोड हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. अधिकारी व कर्मचारी असा कोणताही वेगळेपणा न ठेवता बाप्पांसमोर सर्वजण सारखेच असा संदेश या कृतीतून पोलिसांनी समाजाला दिला. मिरवणुकीत बाप्पांपुढे महिला पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नि:संकोच गणरायासमोर फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. मिरवणुकी मध्ये टप्प्या टप्प्याने मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके ही पाहण्यासाठी गर्दी झाली होती.पो निनिलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गणरायाची विसर्जन मिरवणूक काढली. त्यामुळे पोनि तांबे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

"आधी स्वत: आचरण करावे, मग लोकांना सांगावे"

कोणत्याही गोष्टीचा उपदेश करण्यापूर्वी किंवा इतरांना शिकवण्यापूर्वी ती गोष्ट स्वत: करणे आवश्यक आहे.यावर्षी डॉल्बी विरोधात नागरिकांमधुन प्रचंड विरोध होता. प्रशासनानेही डॉल्बी बंदीसाठी कंबर कसली होती. त्यानुसार तालुका पोलिस ही नजर ठेऊन होते. परंतू जेव्हा आपण स्वतःच्या कृतीतून हे दाखवतो, तेव्हाच त्या विषयाला किंवा उपदेशाला लोक महत्त्व देतात आणि ते अधिक प्रभावी ठरते. म्हणुन पोलिस ठाण्याच्या बाप्पांची विसर्जन मिरवणुक पारंपारिक पद्धतीने आम्ही काढली. ही सार्वजनिक मंडळांना दिशादर्शक ठरावी एवढीच इच्छा.

पो. नि. निलेश तांबे, प्रभारी, सातारा तालुका पोलिस ठाणे.

यांचे सहकार्य मोलाचे... .

ही आगळी वेगळी मिरवणुक आसनगाव ( ता. सातारा) व मेढा येथील वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व वयोगटातील वारकऱ्यांमुळे तसेच चिमुकल्यांसह मोठ्या मुला मुलींनी दाखवलेल्या इतिहासकालीन ढाल तलवार, दांडपट्टा, तलवारबाजी लाठीकाठीच्या प्रात्याक्षिकांनी उपस्थितांचे डोळ्याचे पारणे फिटले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डीजेबाबत विचारणा केल्याने बापलेकाला मारहाण
पुढील बातमी
वाद मिटवण्याच्या बैठकीतच मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

संबंधित बातम्या