सातारा : सातारा शहरा नजीकच्या युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असणार्या कास पठारावरील फुलांचा हंगाम यंदा पर्यटकांसाठी महागण्याची चिन्हे आहेत. पर्यटकांना ऑनलाईन नोंदणीसाठी आता दीडशे रुपये मोजावे लागणार आहेत. पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने ही अल्प वाढ करण्यात आल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
कास पठारावर फुलांच्या हंगामामध्ये साधारणत: 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान एक लाखापेक्षा अधिक पर्यटक या पठाराला भेट देत असतात. जागतिक वारसा स्थळ असणार्या कास पठाराचा पर्यावरण हंगाम आणि येथील निसर्गाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पर्यटकांचा मर्यादित वावर या दृष्टीने ऑनलाईन बुकिंगचे नोंदणी शुल्क दीडशे रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम पर्यटकांसाठी थोडासा महागणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये यंदा श्रावणामध्ये रिमझिम पावसापेक्षा मुसळधार पावसाचा विपरीत अनुभव सातारावासियांना येत आहे. आगामी 72 तासांमध्ये हवामान विभागाने सातारा जिल्हा घाटमाथा तसे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. असे असतानाही सातारा वनविभागाने मात्र पर्यटन हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने नुकतेच बैठकांचे सत्र आटोपले. बैलगाडी, टांगा तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचे नियोजन केले जाणार आहे. या बसेस सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या असून मर्यादित कालावधीसाठी त्या कास वनव्यवस्थापन समितीला सोपवल्या जाणार आहेत. त्या दृष्टीने सातारा वनविभाग पत्रव्यवहार करत असल्याचे सांगण्यात आले. कास पठारासह नवरा-नवरीचा डोंगर, बामणोली परिसर, शेम्बडी महाराजांचा मठ तसेच कास पासून पुढे महाबळेश्वरकडे जाणारा शिवकालीन मार्ग आणि तेथील निसर्ग सौंदर्य अशी पर्वणी पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. मात्र त्याकरिता दीडशे रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. या शुल्क वाढीच्या संदर्भाने वनव्यवस्थापन समितीने पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीनेच ही वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. पार्किंग स्थळ विशिष्ट मर्यादेत ठेवून मुनावळे च्या पश्चिम बाजू कडून कास पठारावर येण्याकरिता बैलगाडी, टांगा आणि इतर पर्यावरण पूरक साधनांचा वापर केला जाणार आहे.
कास पठारावर जाण्याकरता यापूर्वी शंभर रुपये मोजावे लागत होते. मात्र यंदा याकरिता दीडशे रुपये आकारले जाणार आहेत. यामुळे पर्यटकांचा थोडा हिरमोड होण्याची शक्यता आहे. मात्र पठारावर होणारी पर्यटकांची गर्दी तसेच इतर सुविधांचे वितरण, देखभाल, व्यवस्थापन या दृष्टीने ही वाढ लागू असेल, असे वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. ऑफलाईन नोंदणी ही पूर्णपणे बंद राहणार आहे. एकेरी वाहतूक तसेच वाहतुकीचे नियमन आणि कास पठारावर सर्व बाबींचे नियोजन आणि नियमन या दृष्टीने व्यवस्थापन समितीसह वनविभागाचे कर्मचारी सातारा व जावली तालुका पोलीस सातारा व जावली वनविभाग तसेच ऐच्छिक स्वयंसेवक अशी मोठी यंत्रणा येथे उपलब्ध असणार आहे. या सर्व तयारीचा आढावा सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी नुकताच बैठकीत घेतला. या बैठकीमध्ये स्थानिकांना स्वयंरोजगार देण्याच्या दृष्टीने पंधरा अर्ज आले. त्या अर्जांचा विचार करून त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने जागा निश्चित करून दिल्या जाणार आहेत, असे उपवनसंरक्षक सातपुते यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे कास पठारावरील फुलांचा हंगाम लांबणीवर ?
यंदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्यातील मागील पंधरवड्याचा सर्व अनुशेष पावसाने गेल्या तीन दिवसात भरून काढला आहे. एक ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान 167 आणि 20 जुलै ते 30 जुलै या दरम्यानचा 10 असा 26 टक्के अनुशेष पावसाने भरून काढत सरासरीची कामगिरी केली आहे. येत्या 23 तारखेला पिठोरी अमावस्येनंतर आश्लेषा नक्षत्र सक्रिय होत असून त्याचे वाहन घोडा असे आहे. त्यामुळे पुढील पंधरवड्यातही पाऊस हा याच पद्धतीने मुसळधार स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कास पठारावरील फुलांचा हंगाम लांबणीवर जाऊ शकतो किंवा पठारावर वेगवेगळ्या पद्धतीची फुले फुलतीलच याची भौगोलिक शक्यता कमी असल्याचे मत नोंदवले जात आहे. या सर्व शक्यता लक्षात घेऊन कदाचित हा हंगाम साधारण आठ दिवसांनी पुढे जाऊ शकतो. मात्र तरीही वनविभाग एक तारखेपासूनच हा हंगाम सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सातपुते यांनी सांगितले. या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येऊन पुढील हंगामाचे नियोजन करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.