सातारा : उसाचे पैसे महिनोनमहिने थकीत ठेवत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांविरोधात संताप उसळला असून, आता हा रोष थेट रस्त्यावर उतरू लागला आहे. दि. ९ मे पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर व्याजासह थकीत रक्कम जमा न झाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सातारा दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना किसान मंचचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे.
किसन वीर, प्रतापगड तसेच काही प्रमाणात अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे तब्बल सहा महिन्यांपासून उसाचे पैसे थकवण्यात आले आहेत. यामध्ये किसनवीर कारखान्याला सरकारकडून उर्जितावस्थेसाठी ४६७ कोटींची मदत मिळूनही आणि शेतकऱ्यांनी उभे केलेले ४३ कोटी मिळून एकूण ५७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असताना गेल्या पंधरा महिन्यांपासून साखर कारखान्यातील कामगारांना आणि शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नसल्याचा आरोप गोडसे यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत चालल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी दिला जाणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ९ मे रोजी प्रदान करण्यात येणार असून त्या कार्यक्रमासाठी ते सातारा जिल्ह्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शंकर गोडसे यांनी सांगितले की, ''शेतकऱ्यांना पाच सहा महिन्यांपासून उसाचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे मुलांची लग्ने रखडली असून पुढील पिकांचे नियोजन कसे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.'' किसन वीर साखर कारखान्यांचे सुमारे ५२ हजार सभासदांच्या कुटुंबांचे भविष्य अंधारात गेले असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
एफआरपी नियमानुसार उस तोडल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असताना ते न दिल्यास १५ टक्के व्याजासह रक्कम देणे आवश्यक आहे. मात्र, हे नियम पाळले जात नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ''कारखाना व्यवस्थापन साखर विकून आपले हित साधत आहे, पण शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही जमा होत नाही,'' असा संतप्त आरोप गोडसे यांनी केला.
दरम्यान, कर्जाचा बोजा वाढत असताना आणि बँकांचे व्याज सुरू असताना उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे.