कृषिमंत्र्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक

by Team Satara Today | published on : 23 July 2025


कराड : महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकरी व शेतीशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. न्याय मिळत नसल्याने दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे असताना कृषिमंत्री रमी खेळत आहेत, हे शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे. या कृत्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट असून मंत्री कोकाटेंचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. दरम्यान, राजीनामा घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अनेक संकटांनी ग्रासले आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, कधी बोगस बियाणे तर कधी शेतमालाला नसलेला भाव. या दुष्टचक्रात शेतकरी पिचला आहे. त्यातच महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकर्‍यांना कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन केवळ मतांचा जोगवा मागितला. निवडणुकीनंतर या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. उलट शेतकर्‍यांना अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. या अन्यायाविरोधात महाराष्ट्रभर विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत.

शेतकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरत असताना, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात शेतकर्‍यांना दिलासा देणारा कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला नाही. दुधातील भेसळ, बोगस खते आणि खतांचे लिंकिंग यांसारख्या गंभीर प्रश्नांवरही अधिवेशनात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. याउलट, ज्या कृषिमंत्र्यांकडून शेतकर्‍यांना मदतीची अपेक्षा आहे, तेच मंत्री सभागृहात ‘जंगली रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

कृषिमंत्री ऑनलाईन जंगली रमी खेळून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी मोठा फंड जमवत आहेत की काय, असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांनी केला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या लॉबीत झालेल्या हाणामारीमुळे विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. अशा घटना लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीच्या विस्मरणाची आणि जनतेच्या प्रश्नांपेक्षा इतर गोष्टींना प्राधान्य देण्याची निदर्शक आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कर्जमाफी, शक्तिपीठ महामार्ग, अलमट्टी धरण उंचीबाबत सातत्याने आंदोलने करत आहेत. दुसरीकडे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे याच विषयावर पदयात्रा सुरू आहे. शेतकर्‍यांचे नेते रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापेक्षाही आमदार, खासदार फोडणे आणि आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई, पुणे महानगरपालिकेत सत्ता मिळवणे अधिक महत्त्वाचे वाटते, असा आरोप स्वाभिमानी संघटनेने केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मावळा फौंडेशनतर्फे ॲड. वर्षा देशपांडे यांचा उद्या सत्कार
पुढील बातमी
जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तुंचा 24 जुलै रोजी लिलाव

संबंधित बातम्या