सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सातारा जिल्हा रुग्णालयात रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशन आणि बहामाजमधील रोटरी क्लब ऑफ ईस्ट नासाऊ यांच्या सहकार्याने सुमारे ५० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक रक्त घटक विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण ३० जून रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा रुग्णालयात होणार असून, त्यानिमित्ताचा मुख्य समारंभ माऊली ब्लड बँकेच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एस. के. रोटी, रोटरी फाउंडेशनचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन सुधीर लातूरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पचे सचिन शेळके, सचिन कलानी आणि डॉ. शंकर गोसावी यांनी विशेष योगदान दिले आहे.अत्याधुनिक यंत्रणेमुळे संपूर्ण रक्तापासून विविध रक्तघटक वेगळे करून अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्ण, माता-बालक तसेच शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले रक्तघटक वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला मोठी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाची माहिती रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पचे अध्यक्ष निधीमान निकम आणि वैशाली निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.