भुईंज : वाई येथील अभिजीत उल्हास भोईटे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर असलेल्या किलीमांजारोवर यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. अभिजीत भोईटे यांनी महाराष्ट्रातील कळसुबाईसह अन्य शिखरेही त्याने सर केली आहेत. नोकरीनिमित्त सध्या ते दुबई येथे स्थायिक आहेत.
सह्याद्रीच्या डोंगर-दर्यांमध्ये लहानाचा मोठा झालेल्या या मावळ्याने किलीमांजारोसारख्या आंतरराष्ट्रीय शिखरावर चढाई करण्याचे स्वप्न लहानपणीच उराशी बाळगले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. 15 ऑगस्ट रोजी हे शिखर सर करण्यास सुरुवात केली आणि 21 ऑगस्टला त्याने हे शिखर यशस्वी सर करत त्याच्या कळसावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला. 5 हजार 895 मीटर उंच (19,340 फूट) हे शिखर सर करणे म्हणजे गिर्यारोहकांसाठी एक स्वप्नपूर्तीच असते. ही स्वप्नपूर्ती अभिजीत भोईटे यांनी पूर्ण केली.