नागरिकांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन; ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सातारा नगरपरिषद सरसावली

by Team Satara Today | published on : 03 November 2026


सातारा : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करताना आपल्या आनंदाचा त्रास इतरांना होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन सातारा नगरपरिषदेने केले आहे. फटाक्यांच्या आवाजाने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास तसेच धुरामुळे वाढणारे हवेचे प्रदूषण लक्षात घेता, यंदाची दिवाळी जबाबदारीने आणि पर्यावरणाचा समतोल राखत साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिवाळीच्या काळात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने शहरातील हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असते. फटाक्यांतून बाहेर पडणारा धूर आणि रासायनिक घटक श्वसनसंस्थेसाठी घातक ठरू शकतात. त्याचबरोबर कानठळ्या बसविणारा आवाज लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे उत्सव साजरा करताना सामाजिक भान आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी जपणे गरजेचे आहे.
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने 'माझी वसुंधरा अभियान ७.०' आणि 'स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' या उपक्रमांतर्गत नागरिकांना प्रदूषण नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ, गल्लीबोळ आणि रहदारीच्या ठिकाणी फटाके फोडल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी टाळावी. रुग्णालये, शाळा, न्यायालये, शासकीय कार्यालये आणि अन्य शांतता क्षेत्रांमध्ये फटाके फोडण्यास मनाई असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये ध्वनिक्षेपकांचा वापर करताना संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. फटाके वापरणे अपरिहार्य असल्यास कमी आवाज आणि तुलनेने कमी उत्सर्जन करणाऱ्या हरित फटाक्यांची निवड करावी. मात्र, हरित फटाकेही पूर्णपणे प्रदूषणमुक्त नसल्याने त्यांचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सणाचा उत्साह जपूया, पर्यावरणाचेही रक्षण करूया!
दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि मांगल्याचा सण आहे. हा आनंद साजरा करताना ध्वनी व वायू प्रदूषणामुळे दुसऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. न्यायालयीन निर्देशांचे पालन करून सातारा शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, मुख्याधिकारी विनोद जळक तसेच नगरपरिषदेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
पुढील बातमी
जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; महायुतीचे १३, राष्ट्रवादीचे ८ संचालक; शंभूराज देसाईंची पराभवाची परतफेड, जयकुमार गोरेंची दणदणीत एन्ट्री

संबंधित बातम्या