सातारा : बोगदा ते परळी दरम्यान शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एसटी बसला ओलांडण्याच्या प्रयत्नादरम्यान समोरून आलेल्या वाहनाच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो थेट बसखाली गेल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
करण संग्राम देवकुळे (रा. आरे दरे, ता. सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डबेवाडीहून साताऱ्याकडे येत असताना बोगदा परिसरात त्यांनी एसटी बसला पुढे जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने करण रस्त्यावर फेकला गेला आणि मागून येणाऱ्या एसटीच्या चाकाखाली सापडला.
अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ बोगदा–परळी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
करण देवकुळे यांना गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेमुळे देवकुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरू होती. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.