सातारा : पिरवाडी परिसरातील एका इमारतीमध्ये अज्ञात तीन चोरटे घरफोडीचा प्रयत्न करून पळून जात असताना त्यातील एकाचा मृत्यू झाला असून स्थानिकाच्या दक्षतेमुळे एकास पकडण्यात आले आहे. दरम्यान एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
महेश दत्तात्रय मंगळवेढेकर आणि वेदांत शांताराम आरोडे (मयत) दोघेही रा. मंचर, जि. पुणे अशी संबंधित चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी पिरवाडी, ता. सातारा येथील वास्तु प्लाझा अपार्टमेंटमध्ये घरफोडी करण्याच्या उद्देशाने इतर लोकांच्या घरांना बाहेरून कड्या लावून तक्रारदार प्रकाश बाबुराव घार्गे रा. वास्तु प्लाझा अपार्टमेंट, पिरवाडी, सातारा यांचे मेहुणे विकास जगदाळे यांच्या फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून साडेपाच हजार रुपये रोख, निलेश कृष्णा काटकर यांच्या फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून सहा तोळे वजनाचे अंदाजे सहा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले. मात्र स्थानिकांच्या दक्षतेमुळे वैभव गजानन जाधव यांनी त्यातील महेश दत्तात्रय मंगळवेढेकर यास पकडले असता त्याने त्याच्या हातातील लोखंडी कटावणी त्यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली, तर वेदांत आरोडे पळून जात असताना अपार्टमेंटच्या टेरेसवरून पडून मयत झाला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.