सातारा : सातारा जिल्ह्यात रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 14 ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्रचे आयोजन करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील युवक-युवती, महाविद्यालय, उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
रोजगार महाकुंभ हा राज्यव्यापी उपक्रम असून युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तो राबविण्यात येत आहे. या उपक्रमातर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणार आहे. सातारा जिल्ह्यातील युवक युवतींनी त्यांचे शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार उपलब्ध रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा तसेच जिल्ह्यातील प्रत्येक उद्योग, कंपनी, लघुउद्योग, व आस्थापनेने रिक्तपदांची नोंदणी करुन या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विद्यानगर, ता. कराड जि. सातारा, अभयसिंहराजे भोसले इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्नीक शेंद्रे ता. जि. सातारा, छत्रपती शाहू औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेंद्रे ता.जि. सातारा, कै. सौ. वत्सलादेवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाटण ता.पाटण जि.सातारा, यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय कराड ता. कराड जि. सातारा, दादासाहेब मोकाशी प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजमाची ता. कराड जि. सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक वर्ये ता.जि.सातारा, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सातारा (मास भवन) एमआयडीसी, सातारा, यशोदा टेक्निकल कॅम्पस पुणे हायवे रोड, ता.जि. सातारा, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड ता.जि.सातारा, शासकीय तंत्रनिकेतन विद्यानगर कराड ता. कराड जि. सातारा, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, मुधोजी महाविद्यालय फलटण व दर्पण कॉम्पुटर इन्स्टिट्युट कोरेगाव या ठिकाणी मेळावे होणार आहेत.
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांत रोजगाराच्या संधी देणाऱ्या आस्थापनांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा