फलटण : शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका केवळ 9 वर्षाच्या चिमुरडीला तिच्या सख्ख्या मामाने अमानुषपणे मारहाण केली असून या मारहाणीमुळे संबंधित चिमुरडीच्या मनावर आघात झाला आहे. घडलेला मारहाणीचा प्रकार चिमुरडीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मामाच्या विरोधात चिमुरडीचे पिता फलटण शहर पोलीस ठाण्यात गेले असता शहर पोलिसांनी अक्षरश: त्यांना हाकलून लावले. शेवटी हतबल झालेल्या पित्याने सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेवून आपली कैफियत मांडली.
राज्यभरात स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. राज्यात कोठे ना कोठे अशा घटना रोजच समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर फलटण शहरातील उपनगरामध्ये संबंधित चिमुरडी आपल्या आजोळी राहत असते. तिच्या आई-वडिलांचा न्यायालयामध्ये घटस्फोटासंबंधी खटला प्रलंबित आहे. असे असताना संबंधित चिमुरडी कधी पित्याकडे, तर कधी आईकडे राहत असते. दरम्यान, दि. 24 जुलै 2025 रोजी क्षुल्लक कारणावरुन चिडून जावून संबंधित चिमुरडीच्या मामाने तिला अमानुष मारहाण केली. यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी संबंधित मामास मारहाण करण्यापासून रोखले. तरीही या मामाचा राग शांत झाला नाही. मारहाणीमुळे संबंधित चिमुरडी भेदरलेली होती. नात्यातीलच काही लोकांनी ही घटना मुलीच्या पित्यास सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांच्या घराकडे धाव घेतली. मारहाण झाल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित पित्याने फलटण शहर पोलीस ठाणे गाठले. यावेळी माझ्या मुलीला तिच्या मामाने बेदम मारहाण केली आहे. संबंधित मुलीचा आपण जबाब घेवून त्या मारकुट्या मामावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र कोणत्याही कामामध्ये दिरंगाईची सवय असलेले फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मात्र संबंधित पित्यालाच उपदेशाचे डोस पाजून जे काही असेल ते उद्या बघू, असे म्हणून अक्षरश: पिटाळून लावले. त्यानंतर वारंवार त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवले. मात्र, शहर पोलिसांना एवढी मोठी गंभीर घटना घडूनही या विषयात रस नसल्याने संबंधित चिमुरडीच्या पित्याने जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच संबंधित चिमुरडीचा कैफियत मांडणारा व्हिडिओही दाखवला.
यानंतर पोलीस अधीक्षक दोशी यांनी याबाबत संबंधित ठाणेदाराला फोनवरुन सूचना देत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. फलटण शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून महिला अत्याचारासंबंधीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. विशेषत: फलटण शहरामध्ये या घटना जास्त घडत आहेत. मात्र, फलटण शहर पोलीस नको त्या भानगडींमध्ये व्यस्त असल्याने त्यांना अशा घटनांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने महिलांवर हात उचलण्याचे आणि अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे फलटण शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांकडून सांगितले जात आहे.
कंस मामाबरोबर बोगस पत्रकाराच्या मुसक्या आवळा!
फलटण शहरामध्ये एका चिमुरडीला अमानुष मारहाण होते. हतबल पिता फलटण शहर पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवतो. तरीही ठाणेदार शहा यांना या प्रकरणाचे गांभीर्य कळत नसावे काय? शहांचे केस असेच पांढरे झाले काय? फलटण शहर पोलीस ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांच्या मांडवल्याही याच पोलीस ठाण्यामध्ये होत असतात. आयुष्यात कधीही एक बातमी न केलेले गळ्यात पत्रकार असल्याचे ओळखपत्र अडकवून फार मोठा पत्रकार असल्याचे भासवतात. या प्रकरणामध्येही अशाच एका ‘कुख्यात’ बोगस पत्रकाराची मध्यस्ती असल्यानेच फलटण शहर पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोपही पीडित चिमुरडीच्या पित्याने केला आहे. दरम्यान, माझ्या मुलीवर हात उचलून तिला अमानुष मारहाण करणार्या कंस मामासह त्या बोगस पत्रकारावरही कारवाई करावी, अशी मागणीही संबंधित पित्याने ‘सातारा टुडे’शी बोलताना केली आहे.