निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण; संशयित पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 16 July 2026


सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर काही युवकांनी हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री सातारा पालिका परिसरात घडली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यावरील हल्ल्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हा आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सातारा नगरपालिकेच्या परिसरात घडली. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील पालिका परिसरात असताना काही युवकांनी अचानक त्यांना गाठले आणि वाद घालत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रकार घडल्याचे समजताच सातारा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणत मारहाण करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले.

​दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याला कोणत्या कारणावरून मारहाण करण्यात आली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेचे गांभीर्य ओळखून आणि घटनेची माहिती शहरात पसरताच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांची आणि शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या सातारा शहर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, ताब्यात घेतलेल्या संशयित युवकांवर गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोनम वांगचुक यांना केंद्रीय शिक्षण मंत्री बनवा - अरविंद केजरीवाल, केजरीवाल, राकेश टिकैत यांनी घेतली वांगचुक यांची भेट

संबंधित बातम्या