कराड : सुपने (ता. कराड) येथे शेतात पिकाला पाणी देत असणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. विजयसिंह आकाराम पाटील (वय ४३) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विजयसिंह पाटील हे दचाकीने तांब शिवारातील आपल्या शेतात कृषी पंप सुरू करून पिकाला पाणी देत होते. यावेळी पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्याने पाटील सुरुवातीला घाबरले, मात्र त्यांनी तातडीने हिंमत दाखवत जोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करणारे इतर शेतकरी तातडीने त्यांच्या मदतीसाठी धावून आले.
शेतकऱ्यांचा वाढता जमाव आणि आरडाओरड पाहून बिबट्याने तेथून जवळच असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. या हल्ल्यात विजयसिंह पाटील यांना पाठीवर किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सुपने आणि तांब परिसर कमालीच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांना दिवसा शेतात जाणेही धोक्याचे बनले आहे. त्यामुळे वनविभागाने या भागात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.