15 ऑगस्टपासून जलसंधारण अभियानाचा शुभारंभ - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती, सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा होणार

by Team Satara Today | published on : 13 August 2026


सातारा : राज्यात मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी आणि जलसंवर्धनाला एक व्यापक लोकचळवळ बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस असलेला 21 ऑगस्ट हा दिवस आता राज्यात अधिकृतपणे जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2027 दरम्यान जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.

या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 'पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा' याघोषवाक्यासह आणि 'सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो' या थीमवर आधारित ही वॉकेथॉन पार पडणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कमाल तीन किलोमीटर चालून मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व लोकप्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएसचे स्वयंसेवक, शासकीय अधिकारी, डॉक्टर, खेळाडू, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सहभागी प्रत्येक नागरिकाला टी-शर्ट, कॅप, जलदूत बॅज आणि ई-प्रमाणपत्र दिले जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच विजेत्यांना सन्मानचिन्हाने गौरवण्यात येणार आहे. 

या सप्ताहाच्या निमित्ताने 15 ते 30 वयोगटातील युवकांसाठी राज्यस्तरीय इन्स्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर या हॅशटॅगचा वापर करून युवकांना 30 ते 60 सेकंदांची रील तयार करून सादरीकरण करता येणार आहे. यामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे रोख पुरस्कार आणि 'महाराष्ट्र युवा जलदूत' म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. 

तसेच 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी या जलसंधारण अभियानादरम्यान राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, पोस्टर आणि वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. शाळांमध्ये एक शाळा - एक शोषखड्डा हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले जाईल. ग्रामीण व शहरी भागात जलसंधारण कामांचे भूमीपूजन, लोकार्पण, जलपूजन, अमृत सरोवरांना भेटी, पाणलोट क्षेत्रविकास कामे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. शाश्वत आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल व धाब्यांची त्वरित तपासणी करावी - अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
पुढील बातमी
एमबीए/एमएमएस प्रवेशाची दुसरी यादी जाहीर; १४ हजार ८६ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी

संबंधित बातम्या