सातारा - भारतीय संविधानाचे प्रेम नसणारे व त्याचा गाभा मोडणारेच संविधान जागरचा प्रतिक्रियात्मक कार्यक्रम करीत आहेत. त्यांचा हा कर्मकांडी भूलभुलैया ओळखण्याची गरज आहे, असे मत अभ्यासक, संशोधक अंजली चिपलकट्टी (पुणे ) यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने 'मी आणि माझे लेखन' या विषय सूत्रावर आयोजित करण्यात आलेल्या ३९व्या वर्षातील थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अध्यक्ष रमेश इंजे होते. विचार मंचावर डॉ. जयपाल सावंत व सहकार्यवाह डॉ.सुवर्णा यादव उपस्थित होत्या.
अंजली चिपलकट्टी म्हणाल्या, पारंपारिक सांस्कृतिक पर्यावरण व संगोपन याद्वारे समाजाच्या वृत्तीवर दूरगामी परिणाम होत असतात.समाज नेणिवेने घडतो व जाणीवेने बदलतो. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने व एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला योग्य पुरोगामी दिशेने नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.ही महत्त्वाची वळणे आहेत. त्यांनी दिलेली सम्यक, वैज्ञानिक चिकित्सक दृष्टी समाजाने जोपासण्याची गरज आहे. भावनां वर स्वार न होता प्रतिकात्मक उपक्रमांची चिकित्सा करण्याची व त्याची योग्यायोग्यता ठरवण्याची आवश्यकता आहे.
पश्चिमात्य समाज वैज्ञानिक दृष्ट्या प्रगतिशील आहे तर भारतीय समाजात बौद्धिक कुपोषण असल्याने आपण मागे पडलो आहे. आपल्याकडेआर्थिक,सामाजिक, जातीय,धार्मिक प्रचंड विषमता आहे. घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. हळव्या भावनांना फुंकर घालून धार्मिक,जातीय अस्मिता जागवण्यात येत आहेत. आक्रमक,हिंसक वृत्तीचे कौतुक होत आहे. त्याचे अनुकरण तरुण पिढी करत असल्याने समाजात एकूण वातावरण भीतीदायक आहे. चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. पूर्वग्रह व पारंपारिक धारणा या सगळ्यांनी मला अस्वस्थ केले त्यामुळे 'माणूस असा का वागतो?'या दिशेने मी संशोधन व लेखन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक रमेश इंजे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा यादव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.जयपाल सावंत यांनी करून दिला. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. संबोधी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, समीर शिपुरकर( पुणे)तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त व विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.