दहिवडी : मार्डी (ता. माण) येथील शंभूराज शशिकांत राजमाने (वय नऊ) या इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेल्या मुलाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. शंभूराज हा गावातीलच सुनीता नलावडे यांच्याकडे तबला व पेटी वाजवणे शिकण्यासाठी जात असे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास सायकल घेऊन तो शिकवणीला म्हणून गेला होता.
रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही, त्यामुळे त्याच्या पालकांनी नलावडे व इतर मुलांकडे चौकशी केली असता तो शिकवणीला आला नाही, असे सांगण्यात आले. शोधाशोध केल्यानंतर सुनीता नलावडे यांच्या घरामागे असणाऱ्या शेततळ्याशेजारी शंभूराजची सायकल व चप्पल पडल्याचे दिसून आले. त्यानंतर शंभूराजचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला.
मृतदेह आढळताच शंभूराजच्या आई-वडिलांनी टाहो फोडला. आई-वडिलांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार एम. आर. सांगे करत आहेत.