कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील धावरवाडी (ता. कोरेगाव) येथील जयवंत शुगर व गोपूज (ता. खटाव) येथील ग्रीन पॉवर शुगर दोन खासगी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२५-२६ करिता परवानगी दिलेली नसताना गाळप सुरू करू नये, अन्यथा उचित कारवाई करण्याचा इशारा देणारी पत्रे पुणे विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी काढली आहेत.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी जयवंत शुगरच्या जनरल मॅनेजर यांच्या नावे काढलेल्या पत्रात म्हटले आहे, की आपण आपल्या कारखान्यात नवीन अॅडिशनल बसविलेल्या मशिनरी आणि उपकरणांची चाचणी घेण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२५ पासून ऊस गाळप सुरू करण्यास परवानगी मिळण्याबाबत विनंती केली आहे. मात्र, राज्य शासनाचे महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण आणि गाळप व ऊस पुरवठा नियम) आदेश, १९८४ खंड चारमधील तरतुदीनुसार, साखर कारखान्यांना परवाना अधिकाऱ्यांनी गाळप परवाना दिल्याशिवाय साखर उत्पादन करता येणार नाही. साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप कोणत्याही कारखान्याच्या गाळप हंगाम २०२५- २६ करिता परवानगी दिलेली नसताना आपण गाळप हंगामास सुरुवात करू नये. जर आपण गाळप सुरू केला, तर आपल्या कारखान्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.
ग्रीन पॉवर शुगरच्या जनरल मॅनेजरना काढलेल्या पत्रात म्हटले आहे, की साखर आयुक्तांच्या कार्यालयाकडील संदर्भीय ई- मेलद्वारे आपल्या कारखान्याबाबत कळवण्यात आले आहे, की ‘ग्रीन पॉवर शुगर्सच्या गाळपास प्रारंभ’ झाला असल्याबाबत एका वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तेव्हा या वृत्ताच्या अनुषंगाने आपणांस विचारणा करण्यात येते की साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप आपणांस किंवा कोणत्याही कारखान्याच्या गाळप हंगाम २०२५- २६ करिता परवानगी दिलेली नसताना आपण गाळप हंगामास सुरुवात केली किंवा कसे? याबाबतचा स्वयंस्पष्ट खुलासा तत्काळ या कार्यालयास आवश्यक त्या कागदपत्रांसह द्यावा. आपला खुलासा प्राप्त झाला नाही अथवा असमाधानकारक असल्यास आपल्या कारखान्यावर उचित कायदेशीर कारवाई केली जाईल याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.
राज्याच्या मंत्री समितीच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत एक नोव्हेंबर २०२५ रोजी हंगाम सुरू करण्याचे निश्चित केलेले आहे. तत्पूर्वी गाळप हंगाम सुरू करता येणार नाही, असे बंधन घातले गेले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करू नये अन्यथा उचित कारवाई करण्यात येईल, अशी पत्रे काढली आहेत.
- नीलिमा गायकवाड
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
