कराड : अनोळखी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. पुणे- बंगळूर महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड - सातारा मार्गिकेवर रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. सागर यशवंत साळुंखे (वय ३६, रा. कमळापूर- रामापूर, ता. खानापूर, जि. सांगली) असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सागर साळुंखे हे रविवारी दुचाकीवरून (एमएच १० एवाय ३०१०) सातारा दिशेकडे जात होते. रात्री सव्वाअकराच्या सुमारास गोटे गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात साळुंखे हे महामार्गावर पडले. पाठीमागून आलेल्या वाहनधारकांनी अपघाताची माहिती दस्तगीर आगा यांना दिली. जवळच राहत असल्यामुळे आगा तातडीने अपघातस्थळी दाखल झाले.
आगा यांच्यासह जमलेल्या वाहनधारकांना दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याचे निदर्शनास आले. आगा यांनी कराड शहर पोलिस तसेच रुग्णवाहिकेला त्याबाबत कळवले. अपघाताची माहिती मिळताच कराड वाहतूक पोलिस कक्षाच्या अपघात विभागाचे फौजदार मारुती चव्हाण, धीरज चतुर, सागर बर्गे रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी दाखल झाले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.