गणेश भक्तांना लागले बाप्पांचे वेध

यंदा पगडी, फेटा आणि धोतर परिधान केलेल्या गणरायांची क्रेझ : बुकिंगची लगबग सुरु

by Team Satara Today | published on : 27 July 2025


सातारा : श्री गणेशाच्या आगमनाला अवघा एक महिना राहिल्याने कुंभारवाड्यात लगबग सुरु झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील कुंभारवाड्यात घरोघरी व कारखान्यात गणेशमूर्ती बनवण्याची हातघाई दिसून येवू लागली आहे. यंदा पगडी, फेटा अन धोतर परिधान केलेल्या गणेशमूर्तीना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. यंदाचा गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. गणेशमूर्ती सुंदर कशी दिसेल, यावर प्रत्येक भक्तांची वेगवेगळी भावना आहे. त्यामुळे आता विविधरंगी वस्त्रांचा वापर करुन कॉस्च्युम डिझाइनर बाप्पाला सजवत आहेत.

यावेळी एक महिन्यापूर्वीच भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. सध्या कुंभारवाड्यात व कारखान्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत. काही ठराविक स्टॉल्सवर पेणच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात. या मूर्ती सुबक आणि आकर्षक असल्यामुळे भक्तांची देखील पसंती मिळत आहे. दरवर्षी नागरिकांना मूर्तीमध्ये काही तरी नावीन्य हवे असते. गणेशमूर्तीमध्ये शक्यतो डोक्यावर मुकुट असलेली मूर्ती ही कॉमन झाली आहे. फेटा ही महाराष्ट्राची ओळख आहे. फेटा, पगडी व धोतर घातलेल्या मूर्ती आकर्षक दिसत असल्याने नागरिकांचा या खरेदीस प्रतिसाद मिळत आहे.

गणेशमूर्ती सजीव आणि रेखीव दिसण्यासाठी डिझायनर श्रीगणेशाला धोतर, फेटा, वस्त्रांचा वापर करत आहेत. सध्या श्री गणेशाला विविधरंगी वस्त्रांच्या माध्यमातून अधिकाधिक सुंदर बनवण्याचे काम सुरु आहे. एका गाठीवर श्री गणेशाला धोतर बांधणे ही त्यांची खासियत असून सध्या कॉस्च्युम करण्याचे काम सुरू आहे. चार वर्षांपासून हा ट्रेंड सुरू झाला असून त्याला यावर्षीही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.


नानाविध रुपातील मूर्ती विक्रीस
गेल्या काही वर्षातील गणेशमूर्तीवर चित्रपट व मालिकांचा मोठा प्रभाव होता. यंदाच्या वर्षी मात्र तसे चित्र दिसत नाही. महाकुंभवतार, मोदकावर, पाटावर, सिंहासनावर, हत्तीच्या सोंडेवर, मोरावर, पाळण्यात, नंदी बैलावर, पुस्तक वाचताना, स्वामी समर्थांच्या रुपात, विठ्ठलाच्या रुपात, पेशवाई, शंकर पार्वती, समवेत बाल गणेश रुपातील अशी नानाविध रुपातील मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. यंदाचे नावीन्य म्हणजे विविधरंगी फेटा घातलेल्या गणेशमूर्ती आहेत.

गणेश भक्तांकडून गणेश मूर्ती आकर्षक असावी, अशी मागणी होत आहे. सध्या पगडी, घोतर, फेटा नेसलेल्या मूर्तीना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अमेरिकन डायमंड मूर्तींची भक्तांकडून मागणी कमी आहे. आकर्षक मूर्ती बनवण्यास कारागिर वेळ देत असून मागणीप्रमाणे बाप्पांच्या मूर्ती देण्याच्या प्रयत्न केला जात आहे.
- शशिकांत वाईकर, मूर्तिकार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
धरणांतून पाणी सोडल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

संबंधित बातम्या