सातारा : गणेशोत्सवासाठी गावी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. त्यामुळे सातारा बसस्थानकात प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. बसस्थानक गर्दीमुळे फुलून गेले आहे. सातारा-स्वारगेट या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे आगावू बुकींगवर भर देण्यात आला. गर्दीमुळे महामंडळाने विविध मार्गांवर जादा बसेसचे नियोजन केले होते.
अनंत चतुदर्शीने गणेशोत्सवाची सांगता झाल्याने गावी आलेले चाकरमानी पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा ओढा बसस्थानकाकडे वाढू लागला आहे. पुण्या, मुंबईसह विविध ठिकाणी प्रवासी जात असून सर्वच बसेस फुल्ल आहेत. विशेषत: सातारा ते स्वारगेट मार्गावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.
यामुळे महामंडळाने रविवारी मंजूर फेर्यांशिवा सातार्यातून 10 फेर्या, महाबळेश्वर 4, वाई 4, वडूज 3, मेढा 4, पारगाव खंडाळा 4, दहिवडी 3, कोरेगाव 4 अशा 26 फेर्या सोडण्यात आल्या. कराड - स्वारगेट मार्गावर कराड व पाटण आगाराच्या प्रत्येकी 8 अशा मिळून 16 फेर्या सोडण्यात आल्या. फलटण - स्वारगेट मार्गावर फलटण आगाराच्या 10 बसेस सोडण्यात आल्या. महाबळेश्वर- स्वारगेट व वाई - स्वारगेट मार्गावर वाई आगाराच्या 6 व महाबळेश्वर आगाराच्या 4 अशा 10 बसेस सोडण्यात आल्या. सोमवारीही सातारा ते स्वारगेट मार्गावर 15, कराड- स्वारगेटला 10, महाबळेश्वर- स्वारगेट व वाई -स्वारगेट मार्गावर 10 बसेस सोडण्यात येणार आहे.