२६ नोव्हेंबरला साताऱ्यात रक्तदानाचा जागर; पोलिसांकडून आठ केंद्रांवर रक्तदानाचा उपक्रम, नागरिकांना सहभागाचे आवाहन

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील वीरांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना; जिल्हा पोलीस दलासह दोन रक्तपेढ्यांचा पुढाकार

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत असताना या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि पोलिसांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी सातारा जिल्ह्यात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने रक्तदानाचा उपक्रम हाती घेतला असून, एकाच दिवशी जिल्ह्यातील आठ केंद्रांवर रक्तदान शिबिरे भरविण्यात येणार आहेत.
जिल्हा पोलीस दल, अक्षय ब्लड सेंटर आणि माऊली ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत नागरिकांना रक्तदान करता येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहीदांच्या त्यागाचे स्मरण करण्याबरोबरच रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिकांना रक्तदानात सहभागी होता यावे, यासाठी आठ स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सातारा पोलीस मुख्यालय, कराड तालुका पोलीस ठाणे, फलटण शहर पोलीस ठाणे, वाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुसेगाव पोलीस ठाणे, दहिवडी पोलीस ठाणे, पाटण पोलीस ठाणे आणि शिरवळ येथील कबुले हॉल येथे ही शिबिरे होणार आहेत.
मुंबईवरील हल्ल्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय धैर्याची आठवण दरवर्षी २६ नोव्हेंबरला जागवली जाते. मात्र, यंदा त्यांच्या स्मृतींना केवळ पुष्पांजली अर्पण न करता रक्तदानासारख्या जीवनदायी कृतीतून आदरांजली वाहण्याचा प्रयत्न सातारा पोलीस दलाने केला आहे.
रक्ताची गरज कोणत्याही वेळी कोणत्याही रुग्णाला भासू शकते. त्यामुळे या उपक्रमाला केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता रक्तदानाची सामाजिक चळवळ अधिक व्यापक व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. जिल्ह्यातील युवक, नागरिक, सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी आपल्या परिसरातील रक्तदान केंद्रावर उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.a


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा सन्मान होणार! कोल्हापूर सर्किट बेंचचे पद्म पुरस्कार समितीला निर्देश, ऐतिहासिक सन्मानाच्या लढ्याला मोठे यश
पुढील बातमी
अधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुच्छ लेखू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने कामे करून घ्यावी लागतील - शेखर गोरे, काम करणाऱ्यालाच शिवसेनेत संधी

संबंधित बातम्या