सातारा : सातारा शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत सातारा नगरपालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी जागेवरच निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांच्या या ‘ऑन-द-स्पॉट’ निर्णयामुळे रिपब्लिकन सेनेकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
सातारा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस आदी महापुरुषांची स्मारके व पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या परिसरात नियमित स्वच्छता राखावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली होती.
या मागणीच्या अनुषंगाने आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी संबंधित मुकादमांना तत्काळ सूचना देत स्वच्छतेबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यांनी जागेवरच फैसला केल्यामुळे त्यांच्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.
रिपब्लिकन सेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे नेते रमेश उबाळे यांनी धनंजय जांभळे यांचे आभार मानले. यावेळी त्यांना कंदी पेढ्यांचा पुडा व फुलांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
“आरोग्य सभापती असावा तर असा, जो लोकांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करतो,” अशा शब्दांत रमेश उबाळे यांनी धनंजय जांभळे यांचे कौतुक केले.