कराड : कराड-मसूर मार्गावर पहाटे मॉर्निग वॉकला जाणार्या महिलांचे दागिने हिसकावत धूम स्टाईलने पोबारा करणार्या बनवडी (ता. कराड) येथील संशयिताला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. केतन दिनेश जोशी (वय 24) असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी दुचाकीसह चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यानगर (सैदापूर, ता. कराड) परिसरात कराड - मसूर मार्गावर मॉर्निग वॉकला गेलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावत धूम स्टाईलने दोघा संशयितांनी पळ काढला होता. काही दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांना संशयित केतन जोशी याच्यासह त्याच्या साथीदाराबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती.
पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, सज्जन जगताप यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी बनवडी परिसरात शोध मोहिम राबवत संशयित जोशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीतून अन्य एका संशयिताचे नाव समोर आले असून तो अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीनंतर कराड शहर पोलिसांनी संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. तसेच चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.