मल्लखांबाची प्रात्यक्षिके,श्रीराम भक्तीगीते आणि वारकऱ्यांच्या जयघोषाने सातारकर मंत्रमुग्ध

समर्थ सेवा मंडळाच्या पादुका दौऱ्याची यशस्वी सांगता

by Team Satara Today | published on : 03 February 2025


सातारा : श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड व श्री समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळ सातारा, यांचे वतीने श्री समर्थांच्या पादुकांच्या प्रचार दौऱ्याचे सातारा येथे पुनरागमन होत असताना महाराजा सयाजीराव विद्यालय मल्लखांब मंडळ ,सातारा या संस्थेच्या मल्लखांबपटू चे मल्लखांब प्रात्यक्षिक गांधी मैदान सातारा येथे आयोजित करण्यात आले होते.

या प्रात्यक्षिकांमध्ये संस्थेच्या 30 राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. पुरलेला मल्लखांब, दोरीवरील मल्लखांब, तसेच अत्यंत प्रेक्षणीय व चित्त थरारक असे बाटली वरील मल्लखांबची अनेक प्रकारची प्रात्यक्षिके या खेळाडूंनी याप्रसंगी सादर केली. 

एकाच वेळेला अनेक खेळाडूंनी मल्लखांबावर मानवी मनोरे रचून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.अनेक बाटल्यांवरती चौरंग ठेवून त्यावरती मल्लखांबाची अतिशय चित्तथरारक अशी प्रात्यक्षिके केली. या प्रात्यक्षिकांमध्ये संस्थेचे रणवीर मोहिते, ओम पाटील, कुणाल पवार, साई टोणे, जय टोणे, आयुष शिंदे, विघ्नेश फडतरे, तनिष्क श्रेष्ठी, रुद्रप्रताप मोहिते, मंथन माने इत्यादी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरीय विजेते खेळाडू तर कु.आर्या साळुंखे, वैष्णवी पवार, श्रेया पवार, सृष्टी चव्हाण, रुद्राणी भोसले, रिद्धी वेलणकर इत्यादी महिला खेळाडूंनी सहभाग घेतला या सर्व मल्लखांबपटूंना श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते प्रशिक्षक विश्वतेज मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीराम गुणगान या कार्यक्रमात आपल्या कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी.. विश्वाचा महामेरू ..आरंभी वंदीनआयोध्येचा राजा ..सादर करण्यात आले. त्यानंतर विभावरी गोडबोले यांचे ..उठी श्रीरामा ..दशरथा हे घे पायसदान ,..सावळा गे रामचंद्र..  रघुनंदन पाहिले..स्वयंवर झाले सीतेचे,.. सादर होत ..मोडू नका वचनास, द्या मज आणुनी रामा ..चरण तुझे लाभले ....तोडीत बोरे शबरी.. अविरत ओठी येते नाम.. सेतू बांधा रे सागरी ..सादर होत रामभक्त हनुमानाचे ..अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान.. सादर होत.. पायोजी मैने राम रतन धन पायो.. हे हिंदी भक्ती गीत सादर होऊन ..रामा रघुनंदना ..सादर होत ..आज अयोध्या सजली.. या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमात गायनाची साथ प्राजक्ता भिडे, विभावरी गोडबोले ,मिताली लोहार व प्रमोद डोळे यांनी अतिशय सुरेखपणे सादर केली. या कार्यक्रमात मिलिंद देवरे यांची तबला साथ सचिन शेवडे यांची हार्मोनियम आणि सहगायन साथ आणि कमलाकर दळवी यांनी दिलेली तालवाद्यवरील साथ अतिशय सुरेख ठरली.

या रंगलेल्या कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ संगीत समीक्षक राजेंद्र आफळे यांनी अतिशय बहारदारपणे केले .या कार्यक्रमास सातारा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समर्थ भक्त रमेश बुवा शेंबेकर रामदासी, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश व रामदासी, विद्याधर बुवा वैशंपायन यांचे सह डॉ. समीर सोहनी, वेदमूर्ती सागरशास्त्री जोशी सुप्रसिद्ध तबलावादक विश्वनाथ पुरोहित यांचेसह आंबेघर मेढा येथील बाल वारकरी मंडळात चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाची सांगता बालकराकारांनी गांधी मैदानावर सादर केलेल्या वारकरी संप्रदायिक नृत्यने  होत असताना समर्थांच्या पादुकाही मोठ्या आनंदाने योगेश बुवा रामदासी व ज्येष्ठ समर्थ भक्तांनी या बाल वारकऱ्यांच्या गोल फेऱ्यात आणून अतिशय बहारदार असे वारकऱ्यांचे हे नृत्य सातारकरांना विशेष भावले.

याप्रसंगी उपस्थित सातारकर यांचे विशेष ऋण व्यक्त करताना खऱ्या अर्थाने समर्थ सेवा मंडळाच्या या पादुका दौऱ्याची सांगता करण्यासाठी आज हजारो सातारकर या मिरवणूक सोहळ्यात आणि या आगळ्यावेगळ्या अशा शारीरिक कसरतीने भरलेल्या मलखांब खेळाचे प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आणि रामगुण गायन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत याबद्दल मी विशेष ऋण व्यक्त करतो ,असे सांगत समर्थ सेवा मंडळाच्या या कार्यात आपल्या सातारकरांचा सहभाग वाढतो आहे व असेच प्रेम असू द्या अशा शब्दात आपल्या भावना  समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी समर्थ सदनचे व्यवस्थापक  प्रवीण कुलकर्णी, संतोष वाघ, कल्पना ताडे यांचेसह समर्थ सेवा मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी अतिशय सुरेखपणे केले .समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोले यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या उपस्थितीत जावली येथे घेतला जाणार विविध योजनांचा आढावा
पुढील बातमी
नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश

संबंधित बातम्या