सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणाने जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे वाढते वर्चस्व असताना सहकार क्षेत्रातील सत्तेचा महत्त्वाचा गड मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रितपणे राखला. अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर आणि उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याने बँकेच्या सत्तेचे केंद्र या दोन पक्षांकडे गेले आहे. या निवडीने केवळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नाही, तर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांचेही संकेत दिले आहेत.
बुधवारी बँकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांनी निवडीची घोषणा केली. सर्व २१ संचालक उपस्थित होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. या प्रक्रियेत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या राजकीय समन्वयाची चर्चा रंगली.
विशेष म्हणजे, अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना राष्ट्रवादी-शिंदेसेनेने केलेल्या एकजुटीमुळे भाजपला सत्तेच्या सर्वोच्च पदांपासून दूर राहावे लागले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या आधीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय घटनाक्रम अधिक महत्त्वाचा ठरतो. अध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा की पाच वर्षांचा, याबाबतही अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे सध्याची निवड म्हणजे सत्तेचा अंतिम निर्णय की भविष्यातील राजकीय संघर्षाची सुरुवात, याची उत्सुकता आहे.
सहकाराचा वारसा अधिक सक्षम करणार!
उदयसिंह पाटील उंडाळकर, अध्यक्ष
स्वर्गीय विलासकाकांनी उभ्या केलेल्या सहकाराच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बँकेचा कारभार पारदर्शक आणि सक्षम करण्यावर भर राहील. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी शुभेच्छा दिल्या असून सर्वांना सोबत घेऊन काम करू.
शेतकरी आणि सभासदांचे हित सर्वोच्च!
दीपक चव्हाण, उपाध्यक्ष
जिल्हा बँकेची आर्थिक सुदृढता टिकविणे, शेतकरी सभासदांचे हित जपणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणे हे प्राधान्य असेल. सर्व घटकांना विश्वासात घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी काम करणार आहे.
जयकुमार गोरे यांचा सूचक इशारा!
जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, अशी अपेक्षा भाजपचा सदस्य म्हणून व्यक्त करण्यात गैर काही नाही. पक्षाच्या सदस्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत मी सहभागी नव्हतो. त्याची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळाबाबतही मला माहिती नाही. जिल्हा बँकेची निवडणूक झाली म्हणजे सगळे संपले असे नाही. आगे आगे देखो, होता है क्या !असा सूचक इशारा त्यांनी दिला .
जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात नवा अध्याय; भाजपच्या वाट्याला प्रतीक्षाच
राष्ट्रवादी-शिंदेसेनेची एकजूट निर्णायक; उंडाळकरांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा, दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी
by Team Satara Today | published on : 18 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा