ऐतिहासिक वासोटा किल्ला दि. १५ ऑक्टोंबरपासून पर्यटनासाठी खुला; पर्यटकांना अनुभवता येणार वासोट्याचा थरार

by Team Satara Today | published on : 10 October 2026


बामणोली: राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू अन् सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वैभव असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला गुरुवार, दि. १५ ऑक्टोंबरपासून पर्यटनासाठी खुला होत आहे. नैसर्गिक आपत्ती व सुरक्षिततेच्या कारणास्तव हा किल्ला चार महिने पर्यटकांसाठी बंद होता. पावसाच्या उघडीपीनंतर सह्याद्रीतील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी खुली झाली असून, यामुळे रोजगार व पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.
वासोटा किल्ला निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ घालत असतो. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. घनदाट अरण्य, सदाहरित वृक्षराजी अन् अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. वासोटा पर्यटन सुरू होत असल्याने या परिसरातील मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा, अंबवडे येथील बोट व तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
१७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉर्बेट प्रकरणातील आदेशात व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन, पर्यटन क्षेत्रांचे नियमन आणि पर्यावरणीय निर्बंधांवर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून वासोटा किल्ला व परिसर 'सायलेन्स झोन' घोषित करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांनी मोठ्याने घोषणा देणे, गोंगाट करणे तसेच स्पीकर वाजवणे प्रतिबंधित राहणार आहे. दरम्यान वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास आणि परिसरातील शांतता अबाधित राखण्यास मदत होणार आहे.
जुना वासोटा पॉईंट खुला होणार?
वासोटा किल्ल्यावरील पर्यटकांची वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी परिसरातील नवीन पर्यटनस्थळे विकसित करण्याच्या दृष्टीने वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत सर्वेक्षण सुरू असून, 'जुना वासोटा' यासह परिसरातील काही नवीन पर्यटन पॉईंट सुरू करण्याचा वनविभागाचा मानस आहे.
वासोटा सफारीसाठी सुरक्षा नियम असून बोटीत बसल्यानंतर प्रत्येक पर्यटकाने लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक, सफारीदरम्यान मद्यपान व धूम्रपान करू नये. एका बोटीत केवळ १२ ते १५ पर्यटकांनाच प्रवेश. प्रत्येक बोटीत अग्निशमन यंत्र ठेवणे बंधनकारक राहणार आहे.

असे असेल प्रवेश शुल्क
•प्रवेश शुल्क: प्रौढ व्यक्ती १५० रूपये
•लहान मुले (पाच ते बारा वर्षे) : ७५ रुपये
•गाईड शुल्क: ३०० रुपये
•बोट पार्किंग शुल्क: २०० रुपये
•डीएस्एल्आर कॅमेरा : १०० रुपये


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आता प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा; सर्वसामान्यांच्या व्यथा या सरकारला कळत नाहीत
पुढील बातमी
स्पर्धा परीक्षार्थींवर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक; परीक्षार्थींच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार; रोहित पवारांची घोषणा

संबंधित बातम्या