वाई तालुक्यातील जोर येथे २४ तासांत १०० तर पाटणमधील नवजा येथे ८५ मिलिमीटरची नोंद; कोयना धरणातीलपाणीसाठाही ६२ टीएमसीवर

by Team Satara Today | published on : 21 July 2026


सातारा : सातारा शहरात मंगळवारी सकाळपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली असून, पश्चिम भागातही जोरदार पडत आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील जोर येथे २४ तासांत १०० तर पाटणमधील नवजा येथे ८५ मिलिमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर जोरच्या पावसाने यंदा तीन हजार मिलिमीटरचा टप्पाही पार केला आहे. तर कोयना धरणातीलपाणीसाठाही ६२ टीएमसीवर पोहोचल्याने समाधानाची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. पूर्व भागात नसला तरी पश्चिमेकडे हाहाकार माजवला होता. यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला. पण, त्यानंतरच्या आठवड्यात विश्रांती होती. त्यामुळे टंचाईचे सावट निर्माण झाले. मात्र, चार दिवसांपासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे.

या पावसाचा जोर पश्चिम घाट भागातच आहे. त्यामुळे कास, तापोळा, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरातील दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला आहे. सातारा शहरात दोन दिवस पावसाची उघडीप होती. मात्र, मंगळवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला. सकाळी ११ पर्यंत पडतच होता. यामुळे शाळकरी मुले आणि नोकरदार मंडळींचे हाल झाले.

सर्वाधिक पाऊस 'जोर'ला

मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस जोर येथे १०० मिलिमीटर झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३ हजार ८० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे हे ठिकाण ठरले आहे. तसेच पाटण तालुक्यातील पाथरपुंजला ९०, नवजा ८५ आणि महाबळेश्वरला ७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

२४ तासांत कोयना धरणात अडीच टीएमसीने साठा वाढला

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कायम आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणात २८ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात ६१.३० टीएमसी पाणीसाठा झालेला. पाण्याची आवक पाहता सायंकाळपर्यंत कोयनेतील पाणीसाठा ६२ टीएमसीच्या वर जाऊ शकतो. तर २४ तासांत कोयना धरणात जवळपास अडीच टीएमसीने साठा वाढला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी - शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका, अभिजीत दीपके याच्यासोबत चर्चा

संबंधित बातम्या