कराड : मुंढे (ता. कराड) येथे डेंगीसदृश्य आजाराचे रूग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत गावात सुमारे ४० जणांना डेंगीसदृश्य आजाराची लागण झाल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. गावातील विविध वस्त्या आणि मळ्यांमध्ये रुग्ण आढळत असल्याने साथीचा फैलाव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान, पंचायत समिती सदस्य रविंद्र बडेकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंढे गावातील मागासवर्गीय वस्ती, हनुमान वार्ड, साळेव मळा, सावंत मळा आणि परिसरात डेंगीसदृश्य आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. एकाच गावातील वेगवेगळ्या भागांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने साथीचा फैलाव नेमका किती झाला आहे, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. ताप, अंगदुखी आणि इतर लक्षणांमुळे नागरिकांना उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे.
गावात डेंगीसदृश्य आजाराचे सुमारे ४० रुग्ण आढळल्याने केवळ उपचार करून भागणार नाही, तर साथीच्या मुळावर घाव घालण्याची गरज निर्माण झाली आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी साचलेल्या पाण्याची विल्हेवाट, गटारांची स्वच्छता, औषध फवारणी, धूरफवारणी आणि संशयित रुग्णांची तपासणी अशा उपाययोजना युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे.
पंचायत समिती सदस्य बडेकर यांनी या परिस्थितीकडे लक्ष वेधत संबंधित यंत्रणेला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन किती तत्परतेने कार्यवाही करतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. साथीचा फैलाव आणखी वाढण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
कराड तालुक्यातील मुंढे गावात ४० जणांना डेंगीसदृश्य आजाराची लागण; साथीचा फैलाव रोखण्याचे आव्हान
by Team Satara Today | published on : 18 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा