दहिवडी : दहिवडी बसस्थानकाशेजारील एका दुकानाला मध्यरात्री आग लागली. याआगीची धग लागून आणखी दोन दुकाने खाक झाली. या अग्नि तांडवात तिन्ही दुकानातील सुमारे 10 लाख रूपयांचे नुकसान झाले. यावेळी आगीचे मोठ मोठे लोळ उठत होते. म्हसवड पालिकेच्या अग्निबंबाच्या सहाय्याने पहाटे चार वाजता ही आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्टसर्किने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
होळीच्या मध्यरात्री आग लागल्यावर दुकानाने लगेचच मोठा पेट घेतला. ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. शेजारी असणार्या दुकानदारांनी आग आटोक्यात आणण्यासाठी छोटे टँकर मागवले. म्हसवड येथील अग्निशामक बंब मागवला. रात्रभर पाणी मारण्याचे काम सुरू होते. पहाटे चार वाजता ही आग आटोक्यात आली. या आगीत फर्निचर, वह्या, पुस्तके व प्लास्टिकचे साहित्य खाक झाले. या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या हार्डवेअर समोर ठेवलेल्या सिंटेक्स टाक्या आगीच्या धगीने जळाल्या. एका दुकानातील सिमेंटची पोतीही जळाली. याबाबतची तक्रार महेश उगाले यांनी दिली.