54 डॉक्टरांनी मित्राच्या कुटुंबास कर्जमुक्त करुन समाजासमोर ठेवला आदर्श; डॉ. कोडलकर यांच्या निधनानंतर हाऊसिंग लोन फेडण्यासाठी 18 लाखाची रक्कम केली उभी

by Team Satara Today | published on : 31 August 2026



म्हसवड : प्रत्येकाच्या जिवनात काही नाती रक्ताची नसतात, तरी ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट असतात. मैत्रीच्या नात्यात गुंफलेली असतात ,अशीच माणुसकीची आणि संवेदनशीलतेची प्रचिली येथील माणदेशी महिला सहकारी बँकेत नुकतीच आली. म्हसवड येथील माण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांचे निधन नुकतेच झाले. डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी येथील माणदेशी महिला बँकेकडून 25 लाखांचे हाऊसिंग लोन घेतले होते.हयात असताना त्यांनी वेळेवर या कर्जाचे हप्ते भरले होते. त्यांच्या अकस्मित निधनानंतर बँकेच्या या कर्जापैकी सुमारे 19 लाख 84 हजार रुपये रक्कम बाकी होती. डॉ. कोडलकर यांच्या निधनानंतर घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते थकीत राहू लागले. त्यांच्या कुटुंब या थकीत कर्जा मुळे चिंताग्रस्त मनस्थितीत होते.

दरम्यान डॉ. कोडलकर यांच्या निधनाची माहिती त्यांच्या सोबत वैद्यकिय शिक्षण घेतलेल्या सोलापूर येथील डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील 1992 च्या बॅचमधील डॉक्टर मित्रांना समजली याबरोबरच डॉ.कोडलकर यांच्या पश्च्यात त्यांचे कुटुंब बँकेच्या कर्जाच्या ओझ्यामुळे चिंताग्रस्त मनसस्थितीत असल्याचीही माहिती मित्रांना समजताच देश-विदेशात स्थायिक झालेले अनेक मित्रांनी एकत्रीत येत ही तब्बल 18 लाखाची रक्कम उभी केली.

उपक्रमासाठी दहिवडी (ता.माण) येथील डॉ. सार्जीश शहा, आणि माळशिरस येथील डॉ. दत्तात्रय सरजे, यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे सहाध्यायी डॉक्टरांना एकत्र आणून ही मोठी मदत उभी राहिली. विशेष म्हणजे, या 54 डॉक्टर मित्रापैकी काही जण महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून, तर काही अमेरिका, दुबई आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांतून या उपक्रमात सहभागी झाले. अंतर कितीही असो, मित्रासाठी मदतीचा हात देतांना सर्वजण पुन्हा एकदा मनाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.आणि एक-एक असे तब्बल 54 डॉ. मित्र एकत्रित आले.

डॉ. कोडलकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर कर्जाचा भार येऊ नये, हा एकमेव मुख्य उद्देश या सर्व डॉक्टर मित्रांचा होता. रक्तांचे नाते नसतानाही मित्राच्या कुटुंबासाठी संपूर्ण मित्रपरिवार एकत्र येणे, ही या घटनेची सर्वात भावणारी बाव ठरली. मैत्री म्हणजे केवळ सुख-दुःखात सोबत असणे नव्हे; तर मित्र नसताना त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे होय, याचा आदर्श या 54 डॉक्टरांनी मित्राच्या कुटुंबास कर्ज मुक्त करुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

डॉ. कोडलकर यांच्या निधनाच्या पश्च्यात त्यांचे डॉक्टर मित्रांनी एकत्रीत येत त्यांच्या कुटुंबास कर्ज मुक्तीचा लावलेला हातभार पाहता येथील माण देशी महिला बँक व माण देशी फौंडेशनच्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा,माण देशी महिला बँकेच्या नुतन अध्यक्षा अनघा कामत,माण देशी महिला बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनीही या उपक्रमात सहभाग घेऊन बँकेच्या थकीत कर्ज फेडीत खारीचा वाटा उचललत माणदेशी परिवाराकडूनही मदतीचा हात पुढे केला. या उपक्रमामुळे त्यांच्या सहकान्यांनांही विशेष भावुक केले.

नेहा हिच्या शिक्षणासाठीही माणदेशी महिला बँकेकडून मदतीचा हात पुढे


या भावनिक प्रसंगांने माणदेशी महिला बँकेच्या सर्वस्या चेतना सिन्हा आणि माणदेशी फाऊडेशनच्या माध्यमातून कोडलकर कुटुंबाला विशेष मदत करण्यात आली. याबरोबरच डॉ. लक्ष्मण कोडलकर यांची कन्या कु. नेहा हिच्या शिक्षणासाठीही माणदेशी महिला बँकेकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला.यावेळी माण देशी परिवाराचे हितचिंतक आप्पासो पुकळे व रेखा कुलकर्णी यांनीही या उपक्रमाला हातभार लावला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्रातील २ कोटी ७ लाख मतदारांची नावं SIRच्या ड्राफ्ट रोलमधून वगळली; तुमचं नाव नसेल तर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करा

संबंधित बातम्या