सातारा : गझल लिहिणे जेवढे अवघड आहे, तेवढेच गायन कलेच्या माध्यमातून गझल सादर करणे अवघड आहे.गझलचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती समजून सादर करणे गरजेचे असते, असे प्रतिपादन लोकप्रिय गायिका आणि पियानो वादक ममता नरहरी यांनी केले.
दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरीली श्याम यांच्या संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी सभागृहामध्ये गझल गायन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी ममता नरहरी यांनी गझलची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करून त्याचा अर्थ रसिकांपर्यंत पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गझल सादर झाल्या असून आजही त्या लोकप्रिय आहेत, असेही त्यांनी सांगितले. गझल गायक जगजीत सिंग यांच्या जीवनातील काही भारावून टाकणार्या आठवणी पेश करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दुसरे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनीही गझल ही प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी लिहिली जाते किंवा गायली जाते, असे सांगितले. उमराव जान सारख्या चित्रपटातील गझला आजही लोकप्रिय आहेत. कारण त्यातील भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या गझलानी केले असे ते म्हणाले.
यावेळी कैलास मोहिते आणि पूनम धुमाळ यांनी अनेक गझल सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. ओंकार स्वरूपा गाण्याने पूनम धुमाळ यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, जगजीत सिंग अशा अनेक दिग्गजांनी गायलेल्या लोकप्रिय गझल दोघांनी सादर केल्या.
कार्यक्रमाचे निवेदन सविता जाधव यांनी केले. आपल्या नर्म विनोदी आणि मार्मिक शैलीतून गझल म्हणजे काय हे त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचवले. यावेळी दिपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक रसिकांनी आपल्या भावना व्यक्त करून कैलास मोहिते आणि पुनम धुमाळ यांना शुभेच्छा दिल्या. सुधा पटवर्धन यांनी दोन्ही गायकांचे कौतुक करून त्यांना बक्षीस दिले.
गझल हा समजून सादर करण्याचा गायन प्रकार
दीपलक्ष्मी सभागृहातील कार्यक्रमात ममता नरहरी यांचे प्रतिपादन
by Team Satara Today | published on : 08 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा