सातारा : महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा भागामध्ये चोरी करणाऱ्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा दीडशेहून अधिक वाहने चोरणाऱ्या अट्टल वाहन चोराला सातारा शहर पोलिसांनी वाढे फाटा येथे पेट्रोलिंग दरम्यान पकडले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून सात चार चाकी चार मोटार सायकल आणि सहा चार चाकी वाहनांच्या चेसी प्लेट असा 73 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागेश हनुमंत शिंदे (वय 31 रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे.
सातारा शहर परिसरातील वाढत्या वाहन चोरीच्या संदर्भात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सातारा शहर पोलिसांना निर्देशित केले होते.सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला पाचरण करून तपासाच्या सूचना दिल्या .. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, निलेश जाधव,निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, संतोष घाडगे, सचिन रिठे यांच्या पथकाने शहर परिसरात पेट्रोलिंग सुरू करत गुन्हेगारांची माहिती गोपनीय पद्धतीने काढण्याची मोहीम हाती घेतली.
दोन दिवसांपूर्वी सातारा शहर पोलीस वाढे फाटा परिसरात पेट्रोलिंग करत असताना अट्टल वाहनचोर नागेश मास्क लावून मोटार सायकलवरून संशयास्पद फिरताना दिसून आला.पोलिसांनी थांबवून त्याच्या तोंडावरील मास्क काढण्यास सांगितले त्यावेळी सदरचा व्यक्ती रेकॉर्डवरील अट्टल वाहन चोर नागेश शिंदे असल्याचे स्पष्ट झाले.
सातारा शहर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तसेच कागदपत्रांची विचारपूस केली तेव्हा त्याने गाडीची कागदपत्रे नसल्याचे सांगितले. या चौकशीमध्ये नागेश शिंदे यांनी कर्नाटक राज्यामध्ये तसेच विविध ठिकाणाहून गेल्या चार महिन्यात वाहने चोरल्याचे कबूल केले. कर्नाटक पोलीस सुद्धा नागेश शिंदे याचा कसून शोध घेत आहेत. आरोपी शिंदे यांनी आतापर्यंत 150 च्या वर वाहने चोरले असून सातारा शहर, म्हसवड, कर्नाटक राज्यातील निपाणी, सदलगा, चिकोडी, कागल, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगली शहर येथे त्याच्यावर अनेक वाहन त चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नागेश शिंदे याच्या काही ठिकाणांची पोलिसांनी झडती घेतली असता चार चाकी वाहनांच्या चेसी प्लेट मिळवून आल्या आहेत शहर पोलिसांनी पहिल्या टप्प्यात त्याच्याकडून सात चार चाकी आणि चार मोटरसायकल आणि चेसी प्लेट जप्त केल्या असून हा मुद्देमाल तब्बल 73 लाख रुपयांचा आहे.पोलीस अधीक्षक तुषार दोशी वअतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी सातारा शहर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.