नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा दिला नाही तर पूर्ण देशात निवडणूक आयोगाविरोधात मोहीम उघडू असं CJP संस्थापक अभिजीत दीपके यांनी इशारा दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीने निवडणूक आयोग आणि सरकारसमोर ३ मागण्या ठेवल्या आहेत. दिल्लीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अभिजीत दीपके म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व्हावा. त्यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला चालवावा आणि ते कोणाच्या आदेशावर काम करायचे हा तपास केला जावा. आगामी सर्व निवडणुकांवर तात्काळ निर्बंध आणावेत. जानेवारी २०२४ ची मतदार यादी पुन्हा प्रसिद्ध करावी आणि SIR प्रक्रिया रोखावी. सुप्रीम कोर्टाने एसआयआरशी निगडित सर्व फाईली जप्त कराव्यात. निवडणूक आयुक्तांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारा २०२३ चा कायदा मागे घेऊन नागरी समाजाला सहभागी करून घेणारा नवीन कायदा लागू केला पाहिजे अशा मागण्या त्यांनी केल्या.
तसेच ४८ तासांत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर कॉक्रोच जनता पार्टी देशव्यापी आंदोलन चालवेल. आम्ही दिल्लीत पुन्हा बसू आणि जोवर ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवू. आम्ही सर्व राज्यातील शहरांमध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत. जंतर मंतर आंदोलनाआधी आम्ही पूर्ण देशात जसं आंदोलन केले तसेच ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात करू. लोकांच्या मनात राग आहे. जंतर मंतर २.० होईल आणि दिल्लीतील या आंदोलनाची रुपरेषा लवकरच समोर येईल असं अभिजीत दीपके यांनी सांगितले.
विरोधी पक्षांचे चेहरेच काढून टाकले तर लोकशाही टिकेल का?
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा भाजपा २४० जागांवर घसरला, तेव्हा त्यांना देशाचा मूड बदलत आहे हे जाणवले. प्रादेशिक पक्ष खूप मजबूत झाले होते. मात्र एकेक करून त्यांचा पराभव झाला. ममता बॅनर्जींच्या मतदारसंघातून ५०,००० मते वगळली गेली आणि त्या हरल्या. दिल्लीत केजरीवाल यांच्या मतदारसंघातून ४०,००० मते वगळली गेली आणि ते हरले. आमचे विरोधी पक्षांशी किंवा कोणत्याही विशिष्ट पक्षाशी विशेष भावनिक नाते नाही. पण जर तुम्ही विरोधी पक्षांचे चेहरेच काढून टाकले तर लोकशाही टिकेल का? असा प्रश्नही अभिजीत दीपके यांनी विचारला.
४८ तासांत ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पूर्ण देशात निवडणूक आयोगाविरोधात मोहीम उघडू - कॉक्रोच जनता पार्टीचा इशारा
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा