म्हसवडमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण

by Team Satara Today | published on : 12 March 2025


म्हसवड : म्हसवड शहराला आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली असतानाच पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनला जागोजागी गळती लागल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून विकासाच्या बाता सांगण्याऐवजी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी लोकांची तहान भागवण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

म्हसवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी योजना युती शासनाच्या काळात झाली आहे. ही योजना जुनी झाल्याने शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. मात्र नवीन योजनेतून म्हसवड शहरवासीयांना पाणीपुरवठा सुरु होण्यासाठी अजून वाट पहावी लागणार असेल तर तुर्तास तरी जुन्या नळ योजनेवर नागरिकांना तहान भागवावी लागणार आहे. सध्या फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाळा जाणवू लागला असून पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. ग्रामीण भागात अनेक गावांमधून टँकरने पाणीपुरवठा केला जात असून म्हसवड शहरातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अगोदरच शहरवासीयांना आठ ते दहा दिवसातून पाणीपुरवठा होत असल्याने जनता पाण्याचे आठ दिवसाचे नियोजन कसे करते हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

म्हसवड शहराचा विस्तार खूप मोठा असल्याने सर्व नागरीकांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मात्र तरीही काही भागांना पालिकेकडून झुकते माप मिळत असून काही भागांवर पाणी पुरवताना जाणीवपूर्वक अन्यायही करण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

म्हसवड शहरात पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो, तर ग्रामीण भागात हाच पाणीपुरवठा दहा दिवसानंतर केला जातो. म्हसवड शहरातील जनता किंवा वाडी वस्तीवरील जनता पाणीपट्टी समानच भरत असते. मात्र पाणी सोडण्यातही पालिका लोकांमध्ये फरक करून पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यामध्ये पाप करत आहे. काही भागांना जादा वेळ पाणी सोडले जाते तर काही भागांना खूप कमी वेळ पाणी सोडण्यात येते. अशा या भयावह परिस्थितीत म्हसवडची जनता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. इस्लामपूर या भागातून येणारी नळ पाणीपुरवठा योजना ही म्हसवड परिसराच्या आसपास भागांमध्ये ठीक ठिकाणी लिक झाली आहे. हजारो लिटर पाणी 24 तास वाया जात आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून हे पाणी जर वाचवले तर दहा दिवसातून येणारे पाणी एक-दोन दिवस अगोदरही नागरिकांना देता येईल व लोकांची तहान भागवता येईल. याकडे पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी आपल्या मार्च एंडच्या कामातून वेळ काढून पिण्याच्या पाण्याच्या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गहाळ वस्तूंचा लिलाव 25 मार्च रोजी
पुढील बातमी
सौर ऊर्जेवरील विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन योजना शासन आणणार : मुख्यमंत्री फडणवीस

संबंधित बातम्या