सध्या सोशल मीडियासह सर्वत्र सुबोध भावे अभिनित आणि दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. हा चित्रपट सर्वत्र बॉक्स ऑफिसवर १० जानेवारीला प्रदर्शित झाला. गेल्या ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालणारं नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातून सध्या या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी सुबोध भावेच्या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत पोस्ट लिहिल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारांनाही आता या चित्रपटाची भूरळ पडली आहे.
मुळची मराठी असलेल्या मृणाल ठाकूरने सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या मृणालने नुकताच हा चित्रपट पाहिला आहे. तिने चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तिने दिलेली प्रतिक्रिया ‘जिओ स्टुडिओ’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मृणाल ठाकूर म्हणते, “सुबोध भावेंचा ‘संगीत मानापमान’ चित्रपट पाहताना फारच मज्जा आली. मी सुबोध सरांची फार मोठी फॅन आहे आणि मी आजपासून त्यांच्या दिग्दर्शनाचीही फार मोठी फॅन झाली आहे. मला आठवतंय त्यांचा मी ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहिलेला, तेव्हा त्यांच्या चित्रपटातला मी ‘नाही मी बोलत नाथा’ हे गाणं गायलं होतं. मला आज पूर्णपणे तो दिवस आठवला. खूप मस्त चित्रपट आहे. सांगितीक नजराणा असलेला हा चित्रपट खूप सुंदर आहे. मी तर चित्रपट पाहिलाय. तुम्हीही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहा…”
‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षता आपटे हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. हिने ही सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. दरम्यान, अक्षताने लक्षवेधी पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना ‘संगीत मानापमान’ चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अक्षता म्हणते, “जर तुम्ही साऊथच्या बाहुबली चित्रपटाचं कौतुक केलं असेल, डिस्नीचे म्युझिकल मुव्हीही एन्जॉय केले असेल… लहानपणी वाचलेल्या इसापनीतीच्या गोष्टी जर तुम्ही आठवत असतील, तरच आपला मराठीतला मानापमान तुम्हाला कळेल आणि खूप आवडेल. खूप सुंदर, साधी सोपी गोष्ट… कमाल स्क्रीनप्ले… मराठीमध्ये बहुतेक आजवर कधीही न पाहिलेल्या लोकेशन्स आणि सेट्स, सुंदर BGM, सगळी कमाल गाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाण्यांची कमाल प्लेसमेंट, अप्रतिम दिग्दर्शन आणि सुंदर शॉर्ट्स… सगळंच आवडलं! मजा आली. सुबोध भावे यांनी पुन्हा एकदा सुंदर सिनेमा बनवून सिद्ध केलंय. खूप सुंदर”
मृणाल ठाकूर आणि अक्षता आपटेप्रमाणे सलील कुलकर्णी, अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख, शर्वरी लोहकरे, शिवानी सोनार, प्राजक्ता माळी आणि सिद्धार्थ चांदेकरसह अनेक मराठी कलाकारांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केले आहे.