सातारा : भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे ब्रिटनमधून आयात होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीवरील कस्टम्स ड्युटी निम्म्यावर आली असून, महाराष्ट्रातील प्रीमियम मद्याच्या किमतीत घट होण्यास सुरुवात झाली आहे.
ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या व्हिस्की आणि जिनवरील कस्टम्स ड्युटी १५० टक्क्यांवरून थेट ७५ टक्क्यांवर आणण्यात आल्याने आयात खर्चात मोठी कपात झाली आहे. आगामी काळात हे शुल्क ४० टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जॉनी वॉकर, शिवास रिगल, ग्लेनफिडिच, द ग्लेनलिव्हेट आणि बॅलंटाईन्स यांसारख्या नामांकित प्रीमियम ब्रँड्सच्या किमती १० ते १५ टक्क्यांपर्यंत कमी होत आहेत. परिणामी, साधारण ३,५०० रुपयांना मिळणारी बाटली आता ३०० ते ४०० रुपयांनी स्वस्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील अबकारी कर, व्हॅट, वितरकांचे मार्जिन आणि वाहतूक खर्च लागू असल्याने आयात शुल्क ५० टक्क्यांनी घटले तरी अंतिम किरकोळ किमतीत थेट तेवढी कपात दिसणार नाही. सध्या विक्रेत्यांकडे जुना स्टॉक शिल्लक असल्याने बाजारात काही ठिकाणी जुन्या तर काही ठिकाणी नवीन दरात माल उपलब्ध आहे. जुना साठा संपल्यानंतर नवीन एमआरपी सर्वत्र लागू होणार असल्याने ग्राहकांनी बाटली खरेदी करताना लेबलवरील अधिकृत किंमत तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
स्कॉच व्हिस्कीच्या दरात घसरण; आयात शुल्क कपातीमुळे मद्यप्रेमींना दिलासा
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा