भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने लोणंदनगरी उजळली; लोणंदनगरीत पालखीचा विसावा

by Team Satara Today | published on : 16 July 2026


लोणंद : ‘ज्ञानोबा माउली तुकाराम...’ या अखंड नामघोषात विसावलेल्या लोणंदनगरीने पुन्हा एकदा वारीच्या भक्तिमय परंपरेचे अविस्मरणीय दर्शन घडविले. नीरा स्नानाचा हा सोहळा केवळ धार्मिक नसून, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा, समर्पण आणि संतपरंपरेच्या अखंड प्रवाहाचे जीवंत प्रतीक असल्याची अनुभूती प्रत्येक भाविकाला मिळाली.

वाल्हे येथील मुक्कामानंतर सकाळी पालखी सोहळा नीरेकडे मार्गस्थ झाला. पुणे जिल्ह्यातील मुक्कामातून दुपारी सुमारे एक वाजता पालखीने प्रस्थान केले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, म्हणजेच दुपारी दीड वाजता नीरा नदीवरील दत्तघाट येथे माउलींच्या पवित्र पादुकांचे परंपरेनुसार स्नान विधी झाला. पालखी दत्तघाटावर पोहोचताच संपूर्ण परिसर ‘ज्ञानोबा-तुकाराम... माउली-माउली...’ या जयघोषाने दुमदुमून गेला. लाखो भाविकांनी या अद्वितीय सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी दत्तघाटावर प्रचंड गर्दी केली होती.

परंपरेनुसार चोपदार आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत विधिवत पादुकांचे नीरा स्नान करण्यात आले. त्या क्षणी अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. नदीच्या पवित्र जलात स्नान करणाऱ्या माउलींच्या पादुकांचे दर्शन घेताना भाविक भक्तिरसात चिंब झाले. टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या गजराने नीरा नदीचा प्रत्येक काठ भक्तीच्या लहरींनी भारावून गेला.

‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग...’ या अभंगाच्या ओळीप्रमाणे त्या क्षणी वारकरी, नदी, निसर्ग आणि माउली हे सारेच एकरूप झाल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, कपाळावरील गोपीचंदन, गळ्यातील तुळशीमाळ आणि मुखी विठ्ठलनाम असा भक्तीचा सागर दत्तघाटावर उसळला होता.

नीरा स्नानानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सातारा जिल्ह्यात मंगल प्रवेश केला. पाडेगाव येथे लाखो भाविकांनी माउलींचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर हरिनामाचा अखंड गजर करीत पालखी सोहळा सायंकाळी लोणंदनगरीत दाखल झाला. माउलींच्या आगमनाने संपूर्ण लोणंदनगरी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने उजळून निघाली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
E20 पेट्रोलच्या विरोधात कोल्हापुरात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढली दुचाकीची अंत्ययात्रा
पुढील बातमी
१९७७ साली हत्या, ४९ वर्षांनी निकाल, अखेर सुप्रीम कोर्टाना ५ आरोपींना निर्दोष सोडले, यापैकी दोन आरोपींचा आधीच मृत्यू

संबंधित बातम्या