पाटण तालुक्यात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस; उरूलच्या सरपंचासह कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक

by Team Satara Today | published on : 04 July 2026


पाटण : उरूल ता. पाटण येथे मल्हारपेठ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५०० रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उध्वस्त केले असून, उरूलच्या सरपंचासह त्याच्या एका साथीदाराला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तीन जणांना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

​सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांना उरूल येथील राजेंद्र गणपतराव थोरात याच्या घरात बनावट नोटा असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत थोरात याच्या घरावर छापा टाकून झाडाझडती घेतली. यावेळी घराच्या बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरची तपासणी केली असता, ५०० रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या १७ बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी या ८ हजार ५०० रुपये दर्शनी किमतीच्या बनावट नोटांसह गुन्ह्यात वापरलेली एक कार जप्त केली आहे.

​पोलीस प्राथमिक चौकशीत संशयित राजेंद्र थोरात याने या बनावट नोटा गावात राहणाऱ्या नितीन जलदेव निकम याच्याकडून बाजारात खपवण्यासाठी घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून उरूल बसस्थानक परिसरातून नितीन निकम याला ताब्यात घेतले. निकम याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने या नोटा मनोज दशरथ निकम (रा. इचलकरंजी) आणि गौसपाक अब्दुलरज्जाक जमादार (रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्याकडून मिळवल्याचे सांगितले. तसेच मनोज निकम याने या नोटा त्याचा मित्र आशुतोष राऊत (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली आहे.

​याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र गणपतराव थोरात (वय ४२, रा. उरूल, ता. पाटण, जि. सातारा), नितीन जलदेव निकम (वय ४७, रा. उरूल, ता. पाटण, जि. सातारा), मनोज दशरथ निकम (वय ३६, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर), गौसपाक अब्दुलरज्जाक जमादार (वय ३९, रा. शिवाजीनगर कोरोची, जि. कोल्हापूर) आणि आशुतोष राऊत (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. ही यशस्वी कारवाई स.पो.नि. हेमंतकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून, या बनावट नोटांचा मुख्य स्रोत आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम नाईक करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ॲट्रॉसिटी' कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समिती बैठक

संबंधित बातम्या