सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक 349/2017 प्रकरणी न्यायालयाने आरोपी अजित जगन्नाथ बोभाटे (वय 35, रा. मुळीकवाडी, ता. जि. सातारा) याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
प्रकरणात फिर्यादी प्रल्हाद मारुती जगदाळे (वय 64, रा. पंताचा गोठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 23 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास मुळीकवाडी येथील त्यांच्या शेतात केळीचा घड तोडल्याच्या कारणावरून आरोपी अजित जगन्नाथ बोभाटे याने संतापून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर हातातील कुऱ्हाडीने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच डाव्या गालावरही वार केला, मात्र त्यात किरकोळ दुखापत झाली.
या घटनेनंतर आरोपीला दि. 24 ऑगस्ट 2017 रोजी अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस फौजदार सी.आर. पाटील यांनी केला होता. या प्रकरणात एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम 326 अंतर्गत आरोपीस दोषी ठरवत कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व 1,000 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास 30 दिवसांची साधी कैद सुनावली आहे. तसेच कलम 324 अंतर्गतही कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र कलम 504 व 506 अंतर्गत आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून श्रीमती बडवे यांनी काम पाहिले. तसेच पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुपे व भोसले यांनी कोर्ट पैरवी केली.