अल्पसंख्यांक मुलींच्या शिक्षणासाठी गेंडामाळ कब्रस्थान ट्रस्टचा ऐतिहासिक पुढाकार ; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय

by Team Satara Today | published on : 23 January 2026


सातारा : मुली शिक्षित झाल्या तर समाज घडतो.अडाणी आई घर वाया नेते, तर शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबाला उजेडात आणते. याच विचारसरणीला प्रत्यक्ष कृतीचे रूप देण्यासाठी गेंडामाळ कब्रस्थान ट्रस्ट, सातारा यांनी अल्पसंख्यांक मुस्लिम मुलींच्या उच्च शिक्षणासाठी एक महत्त्वाचे आणि दूरगामी पाऊल उचलले आहे.ट्रस्टच्या वतीने मुलींचे वसतिगृह (Hostel) सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात यावे, अशी  मागणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे करण्यात आली. 

हे वसतिगृह अल्पसंख्यांक विकास कार्यक्रमात समाविष्ट असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थिनींसाठी ते शिक्षणाचा भक्कम आधार ठरणार आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा जपणारे बाबाराजे म्हणजे विकासाची गंगा प्रत्येक घरात, प्रत्येक जाती-धर्माच्या समाजघटकापर्यंत पोहोचविणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. या मागणीवर त्यांनी केवळ शब्दांचे आश्वासन न देता, “फैसला ऑन द स्पॉट” म्हणजे काय असते, हे कृतीतून दाखवून दिले. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून इस्टिमेट तयार करावे, आवश्यक पूर्तता करावी, कामाला तातडीने गती द्यावी, अशा स्पष्ट व ठाम सूचना त्यांनी दिल्या.

याचवेळी गेंडामाळ कब्रस्थान ट्रस्टच्या हॉलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याबाबत देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रासाठी सुसज्ज लायब्ररी, बैठक व्यवस्था, प्रोजेक्टर,डिजिटल लायब्ररी, अत्याधुनिक क्लासरूम यांची उभारणी करण्याचे आदेश सातारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणात पुढे यावेत, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात यावेत, त्यांच्या डोळ्यांत स्वप्ने आणि हातात संधी यावी, ही बाबाराजेंची तळमळ या निर्णयातून स्पष्टपणे दिसून आली.

याप्रसंगी गेंडामाळ कब्रस्थान ट्रस्टचे चेअरमन साजिदभाई शेख, फारुक शेख, मुजफ्फर शेख, रफिक इसाक शेख, रफिक शफीक शेख, मुहम्मद शेख, मुबीन बागवान, सादिकभाई शेख आदी विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते. अशा दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला उपस्थितांकडून सलाम व्यक्त करण्यात आला.

 शिक्षण, विकास आणि सामाजिक समतेच्या या लढ्यात बाबाराजे सदैव पुढेच राहोत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळा तालुक्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा छाननीबाबत खुलासा; 2 अर्ज अवैध, 92 उमेदवारांचे 120 अर्ज
पुढील बातमी
कोरेगाव तालुक्यात निवडणूक छाननीत ११ अर्ज बाद; जिल्हा परिषदेसाठी ४९ तर पंचायत समितीसाठी ८७ उमेदवार मैदानात

संबंधित बातम्या