सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिपत्याखाली कार्यरत सातारा डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजन को-ऑपरेटिव्ह सोसायटी (जिल्हा केडर) या गटसचिवांच्या जिल्हा संघटनेमार्फत वेतनवाढीचा नवीन करार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा केडरचे पदसिद्ध अध्यक्ष खासदार नितीन पाटील बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकरी तथा जिल्हा केडरचे सचिव डॉ. राजेंद्र सरकाळे आणि केडरचे अध्यक्ष संदीप कदम आणि केडरचे इतर पदाधिकारी यांच्यात संपन्न झाला. बँकेचे संचालक व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनानी प्रेरित या करारनामा प्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी सहकार व पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष मा. अनिल देसाई, मा. प्रभाकर घार्गे, मा. दत्तानाना ढमाळ, मा. राजेंद्र राजपुरे, मा. प्रदिप विधाते, मा. सुनील खत्री, मा. रामराव लेंभे, मा. ज्ञानदेव रांजणे, मा. सुरेश सावंत, मा. लहुराज जाधव, संचालिका मा. सौ. कांचन साळुंखे, मा. सौ. ऋतुजा पाटील बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम, उपाध्यक्ष रघुनाथ तळेकर, केडरचे अधीक्षक मकरंद भोसले, सरचिटणीस दीपक कचरे, सेवक पतसंस्थेचे चेअरमन श्री. दादासो माने, प्रतिनिधी कल्याण भोसले, शंकर शिंदे उपस्थित होते.
यावेळी बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सचिव हे विकासाचे महत्वाचे विकास घटक असलेने बँकेने त्यांना बँकेचाच एक भाग समजून वेतनवाढीसाठी सकारात्मकता दाखवली आहे. बँकेचा पर्यायाने विकास सेवा संस्थांचा चढता आलेख कायम ठेवणेसाठी सचिवानी कर्ज वाटप आणि वसुली यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन सर्व विकास सेवा संस्था नफ्यात आणणेकरिता प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
मा. खासदार नितीन पाटील म्हणाले, सर्व विकास सेवा संस्थांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना कार्यान्वित करून वेळेत कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राज्यात कर्ज वसुलीबाबत प्रतिकूल परिस्थिती असतानाही गटसचिवांनी आपल्या कौशल्याने व सेवाभावीवृत्तीने अविरत परिश्रम घेऊन विक्रमी कर्जवसुली करण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाची नोंद घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने गटसचिवांना राज्यात सर्वाधिक विक्रमी २२ % पगारवाढ दिली आहे. यामुळे सचिवांना सरासरी ६५००/- ते ८५००/- इतकी भरीव पगारवाढ होणार आहे. त्याचबरोबर एखाद्या सचिव सेवकाचा कामावर असताना मृत्यू झालेस सर्व केडर सचिव यांचा एक दिवसाचा पगार आणि केडर कडून एक दिवसाच्या पगाराची रक्कम असे एकूण जवळपास ७.५० लाख त्याचे वारसास मिळणार आहेत. तालुका सचिव जॉए सचिव, केडर प्रशासन या पदांवर पदोन्नती मिळणाऱ्या सचिवांना अतिरिक्त ३ वेतनवाढ अदा केल्या जाणार आहेत. गतवर्षी बँक आणि केडर यांनी सचिवांना बोनस आणि बक्षीस पगार म्हणून अतिरिक्त ५ पगार अदा केलेले आहेत.
डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था बँकेच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामकाज करीत असून संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी सभासदाना विविध प्रकारचा पिक कर्ज तसेच मध्यम व दीर्घ मुदत कर्जाचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यात ९६० विकास सेवा संस्था असून ९४८ विकास सेवा संस्था नफ्यात असून देशातील हे आदर्श उदाहरण आहे. बँकेच्या मा. संचालक मंडळाने पगारवाढीच्या करारानिमित्ताने चांगला आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गटसचिवांच्या सध्याच्या वेतनश्रेणीत चांगल्या पद्धतीने वाढ होणार आहे. जिल्हा बँकेच्या PACs Computerization मध्ये सातारा जिल्हा बँक अग्रेसर असून बँकेच्या सीबीएस प्रणालीशी सामाऊन घेऊन सभासदांना जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणेबाबत यावेळी त्यांनी आवाहन केले.
या प्रसंगी केडरचे जिल्हा अध्यक्ष संदीप कदम यांनी गटसचिवांच्या पगारवाढीच्या करारामुळे सर्व गटसचिव समाधानी असून, बँकेने गट सचिवांवर टाकलेला विश्वासास पात्र राहून बँकेने व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे कामकाज केले जाईल, असे मत व्यक्त केले.