सातारा : संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समतेची शिकवण दिली आहे. आज त्यांच्या जयंती सोहळ्याला सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येऊन त्यांना अभिवादन करतात. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. जगातील अनेक देशांचे तुकडे झाले पण आपला भारत देश अखंडित राहिला तो डॉ. आंबेडकरांमुळे! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच देशाची अखंडता अबाधित राहिली आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शाहू चौक, सातारा येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी विविध संघटनांनी जयंतीनिमित्त घेतलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. डॉ. आंबेडकरांचा समतेचा आणि बंधुत्वाचा विचार खोलवर रुजला पाहिजे, यासाठी सर्वांनीच जातपात, धर्मपंथ बाजूला ठेवून सामाजिक उन्नतीसाठी, देशाच्या ऐक्यासाठी एकत्र आले पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी त्या काळी क्रांतिकारी विचार मांडून तसे आचरण केले. त्यामुळेच आपल्या देशात सामाजिक ऐक्य टिकून आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करून त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांचा वारसा अखंडपणे जोपासणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.