सातारा : सातारा शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये सातारा शहर पोलिसांची मोठी कामगिरी आहे. यामध्ये शहर पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज सांभाळण्याकरता सर्वाधिक तब्बल 70 महिला पोलीस कर्मचारी आहेत. या सर्व महिला पोलिसांचा शनिवारी जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
शहर पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या विभागात काम करणार्या नारीशक्तीला पोलीस कर्मचार्यांनी मनापासून वंदन केले. या उपक्रमाची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली. शहर पोलीस स्टेशनच्या 70 महिला कर्मचार्यांनी शनिवारी जागतिक महिला दिनानिमित्त फेटे घालून आपल्या कामकाजाचा शुभारंभ केला. आवक-जावक, ठाणे अंमलदार, सायबर सिक्युरिटी, मुद्देमाल कक्ष, आरोपी अभिलेख या वेगवेगळ्या विभागात काम करणार्या महिला पोलिसांचा आजचा दिवस विशेष ठरला. या महिला पोलिसांचा पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक 70 महिला सध्या सक्रिय आहेत. या महिला धडाडीने काम करतात. कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महिलांनी आपल्या कर्तव्य सेवानिष्ठतेबद्दल भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाविषयी बोलताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के म्हणाले, जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान झाला पाहिजे. सातारा शहर पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी या अत्यंत निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष आहेत. संसाराची जबाबदारी सांभाळून शहराच्या कायदा सुव्यवस्थेची काळजी घेणार्या शक्तीची ताकद मोठी आहे. ही ताकद आपण ओळखली पाहिजे आणि तिचा सन्मान केला पाहिजे. म्हणूनच हा कार्यक्रम राबवण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.