सातारा : सातार्यातील तामजाईनगर परिसरात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत तीन फ्लॅट फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. यादव कॉलनी आणि रामचंद्र कॉलनीतील घरांचे दरवाजे व कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 85 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी सुनील श्रीपती जांभळे (वय 53, रा. यादव कॉलनी, तामजाईनगर, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते 24 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी जांभळे यांच्या यादव कॉलनीतील घरासह रामचंद्र कॉलनीतील क्षितीजा रेसिडन्सीमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी लक्ष्य केले. संबंधित घरांच्या दरवाजांना लावलेली कुलपे व कडी-कोयंडे कशाच्या तरी साहाय्याने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
त्यानंतर घरातील सोन्याची चैन, गणपतीचे पेंडंट, सोन्याच्या कानातील दागिन्यांचे दोन जोड, चांदीचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 85 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जांभळे यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.
सातार्यात तामजाईनगर परिसरातील तीन फ्लॅट फोडले; 2.85 लाखांचे दागिने, रोकड लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
by Team Satara Today | published on : 25 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा