सातारा : दि. 23 जानेवारी रोजीच्या काही प्रसारमाध्यमांच्या बातमीमध्ये खंडाळा तालुक्यात छाननीमध्ये 30 अर्ज अवैध ठरवण्यात आले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषद/पंचायत समिती खंडाळा सार्वत्रिक निवडणूक 2026 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वस्तुस्थिती खुलासा केला आहे. खंडाळा तालुक्यामध्ये 3 गट व 6 गणामध्ये 93 उमेदवारांनी 122 अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये फक्त खेड बु. गणातील उमेदवार सविता बापुराव धायगुडे यांनी भरलेले 2 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. 92 उमेदवारांचे 120 अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत.
अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केले असून, वर नमूद उमेदवार वगळता इतर सर्व अर्ज वैध ठरले आहेत. तथापि वैध उमेदवारांची यादी जाहिर करत असताना एका पेक्षा जास्त अर्ज वैध ठरले असले तरी उमेदवाराचे नाव एकदाच दर्शवण्यात येते. तशी यादी प्रसिध्दीस देण्यात आली आहे. तरी या प्रकरणी वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रसिद्धी करण्यात यावी जेणेकरुन उमेदवार व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे आवाहन जिल्हा परिषद/पंचायत समिती खंडाळा सार्वत्रिक निवडणूक 2026 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले.