औंध : गेल्या २० वर्षांपासून नियमित धावणारी सातारा ते कान्हरवाडी एसटी बसच्या फेऱ्या १५ दिवसांपासून बंद असल्याने खटाव तालुक्यातील विद्यार्थी, महिला व वृद्धांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
कोरेगाव डेपोची दररोज सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी, तर संध्याकाळी पाच वाजून ३० मिनिटांनी सातारा ते कान्हरवाडी ही औंधमार्गे धावणारी बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कान्हरवाडी एसटी बंद झाल्याने मायणी, निमसोड, शेनवडी, रहाटणी, वडगाव, उंचीठाणे, पुसेसावळी, कळंबी, वडी, लांडेवाडी, त्रिमली, नांदोशी आदी गावांमधील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
सध्या दहावी, बारावीच्या परीक्षेचा हंगाम सुरू आहे, तसेच महाविद्यालयाच्या परीक्षा मे महिन्यापर्यंत असणार आहेत. इयत्ता बारावीचे जादा तास सुरू आहेत. या एसटी बसमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वेळेत पोचणे अवघड होत आहे, तसेच संध्याकाळी उशिरापर्यंत पर्यायी गाडीची वाट बघत ताटकळत थांबावे लागत आहे.
याबाबत परिवहन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की कोरेगाव डेपोची सातारा-कान्हरवाडी ही एसटी फेरी सध्या पुसेगाव- खटाव- वडूज- मायणीमार्गे होत आहे. कारण औंधमार्गे असणारी ही फेरी चोराडे ते मायणी या मार्गे जाते. सध्या या रस्त्याचे काम चालू असल्याने संबंधित ठेकेदाराने रस्ता पूर्ण उखडल्याने तो प्रवासायोग्य राहिलेला नाही. त्यामुळे या मार्गे असणारी गाडी सध्या तरी चालू करता येणार नाही. मात्र, याबाबत विद्यार्थी, पालक व नागरिकांतून तीव्र संताप व नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय परिवहन मंडळाने करावी, अशी मागणी होत आहे.
सातारा-कान्हरवाडी एसटी फेरी विद्यार्थ्यांसाठी सोयीची होती; परंतु मागील पंधरा दिवसांपासून ही फेरी रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कान्हरवाडी एसटीची फेरी लवकरात लवकर सुरू करावी.
प्रा. प्रदीप गोडसे, औंध