सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकर किर्दत आणि प्रभाग सहामधील रविराज किर्दत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत त भाजपाला पाठिंबा दिला. दोन अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दिल्याने भाजपची सभागृहातील संख्याबळ ४२ इतकी झाली आहे.
पालिकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वावर भाजपाने ४० जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत नऊ अपक्ष आणि एक जागा शिवसेनेला मिळाली होती. निकालानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासासाठी अपक्षांनी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले होते. यानुसार शंकर किर्दत आणि रविराज किर्दत यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुरुची येथे भेट घेऊन भाजपाला पाठिंबा दिला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले. भाजपाला पाठिंबा दिलेले शंकर किर्दत हे खा. उदयनराजे तर रविराज किर्दत हे शिवेंद्रसिंहराजे यांचे जुने समर्थक आहेत.