मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यासह राज्याचे राजकारणही ढवळून निघाले आहे. देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस उलटून गेले तरी अद्यापही सगळ्या आरोपींना अटक करण्यात आले नाही. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याने सरेंडर केले आहे. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपलं मौन सोडले आहे.
सध्या सीआयडी कोठडीत असलेले वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जातात. वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सगळ्या गदारोळात आज राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. कॅबिनेट बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
धनजंय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणासोबत माझा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास सुरू असून मी राजीनामा का द्यावा असा उलट सवाल त्यांनी विरोधकांना केला. राऊचा बाऊ करून माझा राजीनामा मागितला जात आहे. मला विनाकारण लक्ष्य केलं जात असल्याचे मुंडे यांनी सांगितले. संतोष देशमुख प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं पाहिजे अशी पहिली मागणी माझीच होती. हिवाळी अधिवेशनातही मीच मागणी केली होती असे त्यांनी सांगितले. आता हे प्रकरण तिथे चालवावं यासाठी प्रयत्न सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या दोषींना फाशी दिली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मुंडेंचा तपासावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावर मुंडे यांनी म्हटले की, या तपासावर मंत्री म्हणून कोणताही प्रभाव माझा होऊ शकत नाही. सीआयडी, एसआयटी आणि न्यायलयीन तपास होणार आहे. त्यामुळे मंत्री म्हणून कोणताही प्रभाव होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.