कराड : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघीही दाखल झाल्या. विशेष म्हणजे, दोघींचे आगमन टप्प्याटप्प्याने झाले असले, तरी काही काळ त्यांनी एकत्रित भजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे प्रीतिसंगमावरील या भेटीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर पवार कुटुंबातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय वाटचाल, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्वतंत्र राजकीय भूमिका, असे चित्र राज्याच्या राजकारणात आहे. या दोन राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची एकाच दिवशी प्रीतिसंगमावर झालेली उपस्थिती त्यामुळे लक्षवेधी ठरली.
दोघीही समाधीस्थळी अभिवादनासाठी वेगवेगळ्या वेळी दाखल झाल्या. मात्र, त्यानंतर काही काळ एकत्रित भजन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक नाती या दोन वेगळ्या बाबी असल्याचा संदेश या उपस्थितीतून जात असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार हर्षदा देशमुख जाधव, आमदार प्रताप पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रीतिसंगमावरील भेटीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा; समाधीस्थळी अभिवादन
by Team Satara Today | published on : 25 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा